Marathi FM Radio
Sunday, April 20, 2025

मराठी नववर्षानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे सांगीतिक भेट !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

मराठी नववर्षानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे सांगीतिक भेट!!

सानिया पाटणकर, अमरेंद्र धनेश्वर यांचे बहारदार गायन तर कला रामनाथ यांच्या व्हायोलिनच्या स्वर्गीय सुरात रसिक चिंब !

पुणे : जगविख्यात व्हायोलिन वादक विदुषी कला रामनाथ यांचे सुरेल वादन, ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांचे बहारदार गायन आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या सुमधुर सादरीकरणाने मराठी नववर्षाची अनोखी भेट रसिकांना मिळाली. निमित्त होते मराठी नववर्षानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित गायन-वादन मैफलीचे.

Advertisement


मैफलीची सुरुवात विदुषी सानिया पाटणकर यांनी जयपूर घराण्यातील विलंबित तीन तालातील ‌‘कहा मैं गुरू ढूंढन जाऊ‌’ या अर्थपूर्ण बंदिशीने केली. त्याला जोडून गुरू डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेली ‌‘गुरू बिन कौन बतावें बाट‌’ ही बंदिश सुमधूर आवाजात सादर केली. पाटणकर यांनी आपल्या मैफलीची सांगता जगविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांनी रचलेल्या ‌‘त ना रे तानी दोम‌’ या तराण्याने केली.

Advertisement

लय आणि जटील तानांवर प्रभुत्व असणाऱ्या विदुषी सानिया पाटणकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अमेय बिचू (संवादिनी), रुची शिरसे, क्रांतिशीला ठोंबरे, करिश्मा टापरे (गायन-तानपुरा) यांनी साथ केली.

Advertisement


यानंतर पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी बसंत रागातील बडा ख्याल आणि छोटा ख्याल ऐकविला. ‌‘नबी के दरबार‌’ ही महमंद पैगंबर यांना उद्देशून असलेली सूफी रचना सादर केली.

Advertisement

यानंतर फाल्गुन महिन्याचे वर्णन करणारी ‌‘फगवा ब्रिज देखन चलो री‌’ ही रचना सादर करून त्याला जोडून ‌‘तनन दे रे ना तदानी दिन‌’ हा तराणा ऐकविला. ‌‘वारी जांगी मै तेरे‌’ हा खमाज रागातील टप्पा ऐकवून पंडित धनेश्वर यांनी संत कबीर रचित
‌‘कैसे दिन कटी है बताए जय्यो रामा‌’ ही चैती प्रभावीपणे सादर केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) यांनी साथ केली.


कार्यक्रमाची सांगता जगविख्यात व्हायोलिनवादक विदुषी कला रामनाथ यांच्या वादनाने झाली.

संगीत क्षेत्रात सातव्या पिढीचा वारसा पुढे नेणाऱ्या विदुषी कला रामनाथ यांनी मैफलीची सुरुवात शुद्ध कल्याण रागाने केली. व्हायोलिनमधून उमटणाऱ्या स्वर्गीय सुरांनी रसिक संमोहित झाले. मैफलीची सांगता दीपचंदी तालातील ‌‘होरी खेलत शाम बिहारी‌’ या होरीने केली. विदुषी कला रामनाथ यांनी आपल्या अद्वितीय वादनातून रसिकांना जणू परिसस्पर्शच केला.

विदुषी कला रामनाथ यांना जगविख्यात तबला वादक पंडित नयन घोष यांचे चिरंजीव व शिष्य ईशान घोष यांनी तबला साथ करताना तबला वादनातील आपले प्रभुत्व दर्शवून रसिकांना स्तिमित केले. ईशान घोष यांच्या तबला सहवादनातून युवा पिढी सांगीतिक वारसा सक्षमतेने पुढे नेत आहे याची प्रचिती रसिकांना आली.

सांगीतिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे सुप्रसिद्ध गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या डॉ. ममता मिश्रा यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. कलाकारांचा सत्कार विदुषी सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन स्वाती प्रभूमिराशी यांनी केले.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular