लग्न ठरविण्यात केलेली अतिघाई घटस्फोटात नेई – विवाहप्रसाद विवाहसंस्था
हा लेख विवाहप्रसाद विवाहसंस्थेकडून प्रसिद्ध –
हल्लीच्या काळात अरेंज मॅरेज मध्ये लग्न ठरविण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत , तसेच लग्न वेळेवर ठरत नाही व ठरलेले लग्न मोडत आहे अशा बऱ्याच तक्रारी संस्थेकडे येत असल्याने हा लेख प्रसिद्ध करत आहे.
हल्लीच्या काळात लग्न ठरल्यानंतर लग्न होण्याच्या आधीच ते मोडणे किंवा ठरल्यानंतर त्यात बरेच त्रास सुरू होणे किंवा लग्न होऊन लगेच घटस्फोट होणे ह्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या आहेत.
ह्या बाबतीत विवाहप्रसाद विवाहसंस्थेने जी कारणे शोधली आहेत ती काही प्रमाणात येथे देण्यात आलेली आहेत.
ह्यात मुख्यतः मुलाकडून ज्या प्रकारची माहिती मुलीला मिळणे आवश्यक आहे ती न मिळाल्यामुळे लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर मुलगी ज्यावेळेस सासरी जाते व समोर खरी वेगळीच परिस्थिती बघते त्या वेळेस तिचा सासरच्या लोकांवरील विश्वास उडून तिला खरी परिस्थिती समजल्यामुळे भांडणाची कारणे तयार होऊन नंतर त्याचे रूपांतर मानसिक त्रासात , भांडणात व शेवटी लग्न मोडण्यात किंवा घटस्फोटात होते.
त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लग्न ठरवण्यात केलेली अतिघाई.
बऱ्याच वेळेस मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळत नाही म्हणून खरी संपूर्ण माहिती समोरच्याला न देता वरवरची थोडीशी माहिती देऊन लग्न ठरवण्यासाठी केलेली घाई दोघांना वेळेचा अपव्यय , पैशाचा खर्च , मानसिक त्रास , भांडणे , बदनामी व नैराश्य देऊन जाते.
ह्यात मुलाची संपूर्ण माहिती करून घेणे हे मुलीकडील लोकांचे देखील कर्तव्य व अधिकार आहे ह्याची जाणीव दोन्ही लोकांना असणे आवश्यक आहे.
ह्यात मुलीचे आईवडील देखील मुलाविषयी फार काही माहिती न घेता किंवा आलेल्या माहितीची शहानिशा न करता लग्न ठरवण्याची घाई करतात.
मुलगी तिचे घरदार सोडून मोठ्या विश्वासाने सासरी जाणार असल्याने मुलाची व मुलाच्या घरच्यांची संपूर्ण माहिती व अपेक्षा समजून घेणे अतिशय आवश्यक आहे .
परंतु बऱ्याच वेळेस लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मुलीला असे समजते की आपण जे काही विचारात घेऊन लग्न ठरवले होते त्यापेक्षा परिस्थिती अतिशय वेगळी आहे त्या वेळेस मुलीची कुचंबना होऊन शेवटी भांडणाची सुरवात होते व त्याचे रूपांतर लग्न मोडण्यात होते.
म्हणून मुलाने स्वतःहून मुलीकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत त्या सर्व मुलीला सांगणे गरजेचे आहे.
ह्यामध्ये प्रथमतः मुलाने स्वतःची संपूर्ण माहिती , त्याचे बॅकग्राऊंड मुलीला व मुलीच्या घरच्यांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे , तसेच आपल्या घरातील चालीरीती , आपल्या घरातील कामाची पद्धत , आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टींची कल्पना देणे देखील महत्वाचे व आवश्यक आहे.
काही घरांमध्ये पूर्वापार चालीरीती व पद्धती चालू असतात तर काही घरांमध्ये नवीन आधुनिक पद्धतीचा अवलंब केलेला असतो त्यामुळे मुलगी आपल्याला व आपल्या घरच्यांना अनुरूप आहे की नाही व आपल्या जीवनशैलीत बसेल की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे.
म्हणून मुलाने आपल्या जीवनशैलीविषयी , चालीरीती विषयी माहिती सांगणे गरजेचे आहे व तिची तशी तयारी आहे की नाही ह्याची कल्पना घेणे अत्यंत आवश्यक आहे
ह्यात मुख्यतः मुलाच्या घरी मुलीला कोणत्या प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे , तिला कोणकोणती कामे करावी लागतील , तसेच त्याकरता मुलाची व मुलाच्या आई-वडिलांची तिच्याकडून काय अपेक्षा आहे हे संपूर्णपणे व्यवस्थितपणे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
यामध्ये अगदी मुलीच्या कपड्यांवरून , शॉपिंग वरून, खर्च करण्याच्या पद्धतीवरून , स्वयंपाक करण्यावरून , व्हेज नॉनव्हेज करणे व खाणे या वरून , पाहुण्यांची उठबस करण्यावरून ते मुलगी घरात कशी वागावी , कशी वागू नये यावरून अनेक प्रकारच्या अपेक्षा मुलाच्या घरच्यांना असतात .
परंतु ह्याची कोणतीच कल्पना मुलीला दिली जात नाही ज्यामुळे पुढे गैरसमज होऊन भांडणास सुरुवात होते.
दुसरे असे की मुलाने माहिती देताना त्याचे शिक्षण तसेच त्याची आतापर्यंतची करिअरची वाटचाल , त्याचे जॉब व जॉब मधील प्रॉब्लेम्स , जॉबच्या वेळा , त्याचे भविष्यातील स्वप्न , त्याचे करिअर व करिअर मधील स्वप्ने , त्याचा पगार , पेमेंट स्लिप , टोटल पॅकेज व दर महिन्याला हातामध्ये येणारा पगार , त्याच्यावर असलेले कर्ज , त्याच्या इतर काही जबाबदाऱ्या , त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या , त्याच्या नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या याची संपूर्ण कल्पना मुलीला देणे आवश्यक आहे.
बऱ्याच वेळेस असे दिसले आहे की पॅकेज खूप मोठे आहे परंतु कर्ज व इतर आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे शिल्लक फारच कमी असते की ज्यामुळे मुलीचा गैरसमज होऊन भांडण होण्यास सुरुवात होते. फक्त मुलामुलींचे पॅकेज पाहून लग्न ठरवण्यापेक्षा त्या बरोबरीने ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
बऱ्याच वेळेस मुलाच्या आईच्या आपल्या सुनेकडून बऱ्याच काही अपेक्षा असतात ज्या लग्न ठरवायच्या आधी मुलीला सांगितल्या जात नाहीत व नंतर त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे घरामध्ये सासू सून भांडणे होण्यास सुरुवात होते.
मुलगी तिचे घरदार व तिच्या चालीरीती सोडून मुलाकडे जात असल्यामुळे मुलाकडील जीवनशैली , त्यांच्या घराण्यातील रीती रिवाज , त्यांच्या घरी करावयाची कामे , त्यांच्या मुलीकडून अपेक्षा ह्या बाबतीत मुलीला पूर्णपणे कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे.
ह्याच बरोबर मुलाने स्वतःच्या व आपल्या कुटुंबात राहणाऱ्या बाकीच्या इतर सदस्यांविषयी देखील संपूर्ण माहिती , आवड निवड , आईवडिलांचे आजारपण , त्यांच्या इतर अपेक्षा याची संपूर्ण माहिती मुलीला लग्न ठरविण्याच्या आधी देणे आवश्यक आहे
मुलाने व मुलीने आपल्या आवडीनिवडी , आपल्या भविष्याच्या कल्पना व ह्या विषयी दोघांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा ह्या विषयी भेटून चर्चा करणे म्हणजे आपले सांसारिक आयुष्य सुखी करणेच होय.
बऱ्याच वेळेस मुलीचे आई-वडील किंवा मुलाचे आई-वडील होकार कळवतात परंतु त्या होकारामागील मुलाच्या किंवा मुलीच्या अपेक्षा व अटी समोरच्यापर्यंत पोहोचवतच नाहीत ज्यामुळे ठरलेले लग्न मोडू शकते किंवा लग्न झाल्यास सतत भांडणे होऊन घटस्फोट होऊ शकतो.
म्हणून प्रथमतः बायोडाटा पाहून फोटोंवरून कल्पना घेऊन पत्रिका पहायची असल्यास ती जुळवून झाल्यावर जर सर्व काही जुळत असेल तर मुला-मुलींनी एकमेकांना भेटून चर्चा करणे गरजेचे आहे.
ह्या मध्ये मुलाने वरील प्रमाणे सर्व माहिती मुलीला देऊन मगच पाहण्याचा कार्यक्रम करावा किंवा पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर ह्या विषयी चर्चा जरूर करावी व मगच लग्न ठरविण्यासाठी दोघांनी पुढाकार घ्यावा.
मुला मुलीने वेळ काढून प्रत्यक्ष भेटून सर्व माहिती एकमेकांना देणे म्हणजेच एकमेकांविषयी विश्वास प्राप्त करणे होय. हा विश्वास वाढवण्यासाठी आवश्यकता वाटल्यास दोघांनी सर्व कागद पत्रे देखील पहावयास द्यावीत.
तसेच हल्ली सोशल मीडिया वरून देखील बरीच खरी व खोटी माहिती मिळत असल्याने ती देखील शहानिशा करावी व गैरसमज टाळावेत.
ज्या वेळेस मुलीला व मुलाला एकमेकांवर पूर्ण विश्वास निर्माण होईल त्या वेळेस दोघांनी मिळून एकत्रितपणे दोन्हीही कुटुंबांना आम्ही लग्न करण्यास तयार आहोत असे सांगितल्यानंतरच घरच्यांनी लग्न ठरवण्यासाठी पुढे जावे.
ज्यावेळेस दोन्ही बाजूकडील सर्व शंकांचे निरसन झाले आहे असे सांगितले जाईल त्यानंतरच लग्न ठरवण्याची चर्चा करावी व त्या चर्चेत देखील लग्न कसे करावे , कधी करावे , लग्नसमारंभ कसा असावा , ह्या बाबतीत एकमेकांच्या अपेक्षा व्यवस्थितपणे मांडणे देखील आवश्यक आहे.
म्हणूनच लग्न ठरविण्यात केलेली अतिघाई लग्न मोडण्यामध्ये परिवर्तित होऊ नये यासाठी वरील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
असे केल्याने दोन्ही बाजूच्या लोकांचा मानसिक त्रास , नैराश्य , बदनामी होणार नाही तसेच लग्न ठरविण्यासाठी जो वेळ व पैसा वाया जातो तो होणार नाही व सर्व गोष्टी आनंदाने पुढे जाऊन मुलाने व मुलीने आपल्याला आयुष्यात काय ऍडजस्ट करायचे आहे याविषयी संपूर्णपणे कल्पना आलेली असल्यामुळे भांडणाचे प्रमाण कमी होऊन सुखी आयुष्याची सुरुवात होऊ शकते.
प्रसाद शिवरकर – संचालक
विवाहप्रसाद विवाह संस्था