गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालयातर्फे तीन दिवसीय विविद स्मृती संगीत समारोहाचे आयोजन !
पुणे : पंडित कुमार गंधर्व आणि पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गांधर्व महाविद्यालय पुणे आणि गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने 24वा विविद स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे दिली.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित विनयकराव पटवर्धन व पंडित द. वि. पलुस्कर यांच्या संगीत कार्यास अभिवादन करण्याच्या हेतूने दि. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून यात पंडित कुमार गंधर्व, पंडित राम मराठे आणि पंडित गजानन बुवा जोशी यांच्या नातवंडांचे सादरीकरण होणार आहे.
संगीत समारोह तीनही दिवस गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात सायंकाळी 6 वाजता होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. 1) भुवनेश कोमकली यांचे गायन होणार असून त्यांना आशय कुलकर्णी (तबला) आणि अभिषेक शिनकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. दुसऱ्या दिवशी (दि. 2) स्वरांगी मराठे-काळे आणि भाग्येश मराठे यांचे गायन होणार असून त्यांना पुष्कर महाजन (तबला), सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (दि. 3) पल्लवी जोशी आणि अपूर्वा गोखले यांचे सादरीकरण होणार असून त्यांना संजय देशपांडे (तबला), प्रवीण कासलीकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
विविद स्मृती संगीत समारोह रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
जाहिरात