गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे प्रा. नरके, डॉ. कोहिनकर यांचा गौरव !!
पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) राष्ट्रपितामह ज्योतिबाराव फुले पुरस्कार तर माईंड पॉवर ट्रेनर व राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. दत्ता कोहिनकर यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समिती आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित विठ्ठल गायकवाड, किरण मोरे, रतनलाल सोनग्रा, रमेश बागवे, डॉ. दत्ता कोहिनकर, सीताराम नरके, ॲड. प्रमोद आडकर, युवराज बनसोडे, अविनाश बागवे आदी.
समता भूमी, महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. पुरस्काराचे यंदाचे पहिले वर्ष आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, युवराज बनसोड, अविनाश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख किरण मोरे, रतनलाल सोनग्रा आदी उपस्थित होते. प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) जाहीर करण्यात आलेला पुरस्कार सीताराम नरके यांनी स्वीकारला.
सुरुवातीस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. विठ्ठल गायकवाड यांनी पुरस्कार वितरणामागील भूमिका विशद केली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार महत्त्वाचे आहेत. आंबेडकर, फुले यांच्या विचारांनी देश चालला तर देशात खऱ्या अर्थाने समानता येईल.
रमेश बागवे म्हणाले, पुरोगामी विचारांद्वारे काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वाहिले. सामाजिक सलोखा राखण्यासाठी अशा पुरस्कारांची आवश्यकता आहे.
पुरस्कारामुळे सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे सत्काराला उत्तर देताना कोहिनकर म्हणाले.
भविष्यात सामाजिक कार्यातील वाटचाल अधिक जोमाने असेल असेही ते म्हणाले. सीताराम नरके यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य समन्वयक युवराज बनसोडे यांनी आभार मानले.
—————————- ——————————-
जाहिरात