गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विकसित भारतासाठी युवकांचा सहभाग अपेक्षित : रक्षा खडसे !
सशक्त व सुरक्षित भारतासाठी युवकांचा पुढाकार हवा : रक्षा खडसे !
विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांशी संवाद !!
पुणे : गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. विकसित भारत योजनेअंतर्गत देशाची आर्थिक उन्नती, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य आहे. विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून त्यांचा सशक्त व सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. ‘माय भारत’च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; कारण राजकारण हे क्षेत्र वाईट नाही, असेही त्यांनी सूचित केले.
रक्षा खडसे यांचे स्वागत करताना भरत अग्रवाल.
विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आज (दि. 20) विकसित भारत ॲम्बॅसेडर : युवा कनेक्ट प्रोग्रामअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री खडसे बोलत होत्या. विवकर्मा समूहाचे अध्यक्ष भरत अग्रवाल, व्हीआयटी, पुणेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर, विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे, उत्पादन-विकास संचालक डॉ. विवेक देशपांडे, माजी विद्यार्थी व जनसंपर्क विभाग अधिकारी प्रा. मुकुंद कुलकर्णी, युथ आयकॉन बिष्णू हजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रक्षा खडसे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात विकसित भारत योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण, पायाभूत सुविधा, शासकीय योजनांमधील पारदर्शकता, अर्थव्यवस्था, जनधन, मुद्रा योजना, शेतीविषयक धोरणे, उज्वल योजना, स्वच्छ भारत, जलजीवन, पंतप्रधान गृह योजना, डिजिटल इंडिया, गती-शक्ती, उडान योजना, सांस्कृतिक वारसा, खेलो इंडिया तसेच युवांचे सक्षमीकरण याविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना खडसे यांनी अवगत केले.
खडसे पुढे म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारने दूरदृष्टी ठेवून अनेक योजनांचे विस्तारीकरण केले आहे. केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांमध्ये युवकांनी सहभाग नोंदवून विकसित भारताचे स्वप्न साकर करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. या योजनांमध्ये युवक सहभागी झाल्यास भविष्यात युवकांनाच त्याचा लाभ होणार आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रात युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी असून या योजनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचे पाठबळ मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात सहभाग तसेच मार्गदर्शक सूचनांचे स्वागत असेल असेही खडसे म्हणाल्या.
शिस्तबद्धता, मानसिक ताणतणावातून मुक्ती, उत्तम आरोग्य तसेच आयुष्यात सर्वांगिण समतोल साधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात सक्रिय रहावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंच्या यशामागील गमकही त्यांनी सांगितले. राजकारण, क्रीडा, महिला सक्षमीकरण याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना खडसे यांनी उत्तरे दिली.
भरत अग्रवाल यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने संस्था विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
विकसित भारत उपक्रमाविषयी कृतिका भंडारी यांनी माहिती सांगितली. बिष्णू हजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींसह संस्थेच्या आवारात रक्षा खडसे यांनी वृक्षारोपण केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू व महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्य भिवपतकी, तसेच स्मार्ट इंडिया हायकेथॉनमधील यशस्वी विद्यार्थ्यांशी खडसे यांनी संवाद साधत त्यांच्या संकल्पनांचे कौतुक केले.
रक्षा खडसे यांचे स्वागत भरत अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. आशुतोष कुलकर्णी यांनी मानले.
__________________________________________
जाहिरात