गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्री व सौ उमेश शरद तळवलकर पुरस्कृत आणि विजय पटवर्धन फाउंडेशन आयोजित “नटश्रेष्ठ, शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा २०२६. काल दिनांक २७ मे रोजी या स्पर्धेचा तिसरा दिवस होता.
एकूण तीन दीर्घांक सादर झाले. पहिल्यांदा, निर्मिती नाट्य संस्था सातारा, निर्मित “लेबल” हा डॉ निलेश माने लिखित आणि दिग्दर्शित दीर्घांक सादर करण्यात आला.
शाळेतील शिक्षकांच्या समस्या आधीच काही कमी नसतात. त्यात एक अशी विचित्र समस्या त्यांच्या समोर येते आणि ती सोडवता सोडवता सर्व शिक्षकांची कशी धांदल उडते याचे खूप छान सादरीकरण ‘निर्मिती नाट्य संस्था, सातारा’ यांनी केले. विनोदाचे अचूक timing साधत सर्व कलाकारांनी उत्तम कामे केली.

साधी सरळ कथा, पण आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना खिळवून ठेवले होते सर्व कलाकारांनी.
तर, मुक्ताई फाऊंडेशन, पुणे निर्मित, बोहाडा हा मुकुल ढेकळे लिखित आणि दिग्दर्शित दुसरा दीर्घांक सादर करण्यात आला. छोट्या छोट्या गावातून, जेव्हा टीव्ही नव्हते, तेव्हा तिथले स्थानिक लोक, गावकर्यांचे मनोरंजन अणि जनजागृती करण्यासाठी ‘बोहाडा’ सादर करायचे.
आपली लोककला, परंपरा आणि संस्कृती जपणारे कलाकार, कला टिकवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड आणि वैयक्तिक व्यथा यावर हा दिर्घांक आधारीत होता. खूप मोठा संच घेऊन नाटक करणं तसं आव्हानात्मक असतं, पण या संघाने खूप छान समतोल साधत उत्तम सादरीकरण केले.

तिसरा दीर्घांक होता, कलाकंड प्रोडक्शन, पुणे निर्मित संकेत देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “विंडोसिट” हा दोन पिढ्यांमधला तिढा, त्यामागची प्रत्येकाची मतं, मध्यमवर्गीय कुटुंबाची रोजच्या जगण्यासाठीची धडपड अणि मुलं शिकून नोकरीला लागावी इतकीच आई वडिलांची माफक अपेक्षा. दुसरीकडे मुलाची अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची धडपड चांगली सादर केली आहे. नास्तिक – आस्तिक मधलं द्वंद्व चांगलं उभं केलं आहे कलाकारांनी.
अणि सरतेशेवटी देवाचे अस्तित्व काबूल करून गाडी रुळावर आली. रेल्वे मधली विंडो सीट पकडण्याच्या नादात उभं राहून सुद्धा बाहेरचा निसर्ग तितकाच सुंदर दिसतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आपलं आयुष्य अणि विंडो सीटची सांगड घालून लेखकाने आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगण्याचा संदेश या दिर्घांकातून दिला आहे.

विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या कार्यात अनेक दिग्गजांचे अनमोल मार्गदर्शन नेहमीच लाभत असते. आजही, सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तेजस बर्वे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि सर्व कलाकारांना त्यांच्या सादरी करणासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेस सांगलीच्या, पुरोहित चेस अकॅडमीचे सौरभ पुरोहित आणि श्रेयस पुरोहित यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.
आज दिनांक २८ मे २०२६ रोजी एकूण तीन दीर्घांक सादर होणार आहेत.
दुपारी १२ वाजता प्रतिभा क्रीएशन निर्मित “डिव्होर्स तुझे हे…”
दुपारी २.४५ वाजता सृजन द क्रीएशन, मुंबई, निर्मित “कॉफीन”
संध्याकाळी ५.३० वाजता कालिबिल्ली प्रोडक्शन, मुंबई निर्मित, “महोगाथा”
उत्तमोत्तम कलाकारांच्या कलेस प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रसिकांनी द बॉक्स थिएटर येथे नक्की यावे.











