गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वासंतिक नाट्य महोत्सवानिमित्त
भरत नाट्य मंदिरातील तंत्रज्ञांचा सत्कार !!
पुणे : भरत नाट्य मंदिरात वर्षानुवर्षे नेपथ्य, प्रकाश योजना, कपडेपट तसेच तिकिट विक्रीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पडद्यामागील तंत्रज्ञांचा आज (दि. 13) रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
पडद्यामागील तंत्रज्ञांसमवेत पांडुरंग मुखडे, अभय जबडे.
निमित्त होते ते 33व्या वासंतिक नाट्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे. भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप झाला.
रंगमंचावर अभिनय करणारे कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, पेहरावात दिसतात.
रंगमंचावरील कलाकारांच्या पाठीमागे असलेले नेपथ्य तसेच प्रसंग उठावदार करणारी प्रकाशयोजना प्रेक्षकांना भुरळ घालते. कलाकारांच्या जोडीने तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सहाय्यकांमुळे नाटकामध्ये अनोखे रंग भरले जातात. पडद्यामागे झटणाऱ्या तंत्रज्ञांना प्रेक्षकांसमोर येण्याची कधी संधी मिळत नाही. ही संधी भरत नाट्य संशोधन मंदिराच्या व्यवस्थापनाने आज त्यांचा जाहीर सत्कार करून अनोख्या पद्धतीने दिली.
उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात पडद्यामागील कलाकारांचे कौतुक केले. विठ्ठल हुलावळे, रामचंद्र घावारे, जितेंद्र सुतार, अभिजित गायकवाड, शंतनू कोतवाल, विनायक कापरे, सुधीर फडतरे, पुष्कर केळकर, नरेंद्र वीर, संदीप देशमुख, राकेश घोलप आणि गणेश भोसले यांचा सत्कार भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार सोहळ्याची संकल्पना कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी विशद केली.