गोल्डन आय न्युज नेटवर्क
हौशी छायाचित्रकारांच्या ‘विंग्ज अन्व्हेल्ड’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन !!
पुणे : निसर्गातील वैविध्यपूर्ण पक्ष्यांच्या छायाचित्रणाविषयी सखोल माहिती देणाऱ्या आणि आकर्षक छायाचित्रे असणाऱ्या ‘विंग्ज अन्व्हेल्ड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. सुधीर हसमनीस, डॉ. पूनम शहा, नेहा फडके, गायत्री हसबनीस-पिंपळे, पल्लवी शिवलकर आणि आनंद विकामशी या हौशी छायाचित्रकारांनी पुस्तकाचे लेखन केले असून प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 25 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुमंत मुळगांवकर सभागृह, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, सेनापती बापट रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुस्तकाचे प्रकाशन जगविख्यात पक्षी छायाचित्रकार जैनी मारिया व प्राईम्स ॲन्ड झूम्सचे संस्थापक, सीईओ अभिजित मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पक्षी छायाचित्रणाकरिता आवश्यक मुलभूत गोष्टी, शेकडो प्रतिमा आणि आकृत्यांनी भरलेल्या या पुस्तकात पक्षी छायाचित्रणातून मिळणारा आनंद, योग्य कॅमेरा गिअर्स, ट्रायपॉडस्, कॅमेरा बॅग, ॲक्सेसरीजची निवड, कॅमेरा सेटिंग्ज आणि तंत्रे, फ्रेमिंग आणि रचना, प्रकाशाचा सुयोग्य वापर, प्रक्रिया, पक्षांच्या छायाचित्रणाविषयी व्यावहारिक माहिती, पर्यावरण आणि संवर्धन, पक्ष्यांची ठिकाणे, छायाचित्रणाप्रसंगी पाळायची आचारसंहित आणि प्रतिज्ञा, कॅमेरा आणि लेन्स कॉम्बोज या विषयी उत्तम माहिती दिलेली आहे.
हे पुस्तक उत्साही पक्षीनिरिक्षक, नवशिके छायाचित्रकार तसेच प्रगत छायाचित्रकारांना अत्यंत उपयुक्त ठरेल. या पुस्तकाद्वारे सर्व लेखकांनी पक्षी छायाचित्रण क्षेत्रात आलेले आपले अनेक दशकांचे अनुभव अतिशय सोप्या शब्दांत वाचकांसमोर मांडले आहेत.
डॉ. सुधीर हसमनीस हे सेवानिवृत्त व्यवस्थापन व्यावसायिक असून त्यांना 12 वर्षांचा वन्यजीव छायाचित्रणाचा अनुभव आहे. डॉ. पूनम शहा या आयुर्वेदिक डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायासह गेली 12 वर्षांहून अधिक काळ वन्यजीव छायाचित्रण करत आहेत. वाणिज्य पार्श्वभूमी असलेल्या व्यावसायिक गायत्री हसबनीस-पिंपळे या 2012 पासून वन्यजीव छायाचित्रण करत आहेत. नेहा फडके या सीए असून 2018 पासून वन्यजीव छायाचित्रण करत आहेत.
त्यांना पक्षी आणि सस्तन प्राण्यांची छायाचित्रे काढण्याची विशेष आवड आहे. फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या पल्लवी शिवलकर या पक्षी शास्त्रज्ञही आहेत. त्यांनी भारतभर प्रवास करून पक्ष्यांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती नोंदविल्या आहेत. आनंद विकामशी हे इंजिनिअर असून तरूण बिझनेसमन आहेत. ते मूळचे हुबळीचे आहेत. 2017 पासून ते वन्यजीव छायाचित्रकार आहेत. पक्षी छायाचित्रणात त्यांना विशेष आवड आहे. कलात्मक छायाचित्रे ही त्यांची खासियत आहे.
————————————–————————-जाहिरात