गोल्डन आय न्युज नेटवर्क
सुरेल, सुश्राव्य गायन-वादनाने सांगीतिक समारोह संस्मरणीय !!
गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त गायन-वादन मैफल !
अपर्णा केळकर, सावनी शेंडे, यांचे गायन तर पंडित प्रमोद मराठे, रोहित मराठे यांचे संवादिनी वादन !!
पुणे : ‘टप्पा’, ‘तराणा’, ‘त्रिवट’, ‘ठुमरी’ तसेच विविध रागातील बंदिशींच्या सादरीकरणाने गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सांगीतिक समारोहातील तिसरा दिवस संस्मरणीय ठरला.
विष्णु विनायक स्वरमंदिरात या सांगीतिक समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक दीपक देसाई आणि सरिता देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा केळकर यांनी गुरू पंडित सी. आर. व्यास रचित मालिनीताई राजुरकर यांच्या आवडीची मारुबिहाग रागातील ‘मोरे नैनवा तरस गए रि निठुर पिया बाट तकत’ ही रचना सादर करून केली. त्यानंतर गुरू डॉ. अरविंद थत्ते यांच्या सरगम गीतावर आधारित तराणा अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना आनंदानुभूती दिली. द्रुत एकतालात तबला आणि पखवाजाचे बोल दर्शविणारा गुरू डॉ. अरविंद थत्ते रचित दुर्गा रागातील द्रुत एकतालातील त्रिवट सादर करून अंतऱ्यात त्याच्या विविध लयी समर्थपणे दर्शविल्या.
सादरीकरणाची सांगता खमाज रागातील पारंपरिक टप्पा व त्याला जोडून द्रुत तीनतालात तराणा सादर करून केली. अपर्णा केळकर यांनी सुमधूर, सुरेल व बहारदार गायनाने मैफलित रंगत आणली. प्रशांत पांडव (तबला), सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), गार्गी काळे, वर्षा लाटे (तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी पंडित बळवंतराय भट्ट रचित बंदिशी व तराणे यांची झलक आपल्या वादनातून रसिकांना दर्शविली. तसेच बिहाग रागातील आडाचौताल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित मराठे यांचे शिष्य रोहित मराठे यांनी आपल्या एकल संवादिनी वादनात राग यमन, देस, बसंतबहारमधील विविध रचना अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना मोहित केले. पंडित प्रमोद मराठे आणि रोहित मराठे यांना प्रशांत पांडव यांनी तबला साथ केली.
कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या बहारदार गायनाने झाली. मध्यलय रूपक तालातील ‘आनंद मनाओ मोरा पिया घर आया’ या बंदिशीला जोडून मध्यलयीतील ‘तू मोरा सैंया निपट अनाडी’ ही राग धानीमधील बंदिश सादर केली. त्यानंतर काशीनाथ बोडस रचित बसंतरागातील ‘मधुकर आज बसंत बधाई’ ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकली.
गुरू विणा सहस्त्रबुद्धे यांचे संवेदनशील मन दर्शविताना राग बागेश्रीमधील ‘श्याम घन छाये’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर ‘दुर्गे भवानी दया कर माता’ ही वीणा सहस्त्रबुद्धे यांनी अजरामर केलेली रचना ऐकवून स्त्रीशक्तीचे रूप दर्शविले. सुप्रसिद्ध ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सावनी यांनी ‘बेदर्दी बन गये मोरे सैया’ ही मिश्र हंसध्वनी रागातील ठुमरी सादर केली.
तसेच आपल्या आजी कुसुम शेंडे व वडिल डॉ. संजीव शेंडे यांना शोभा गुर्टू यांनी शिकविलेली ‘चला है परदेसीया नैना मिलाके’ ही मिश्र भैरवी रागातील पारंपरिक रचना सादर करून सावनी यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. सावनी यांचे सुश्राव्य, बहारदार गायन रसिकांसाठी पर्वणी ठरले.अरुण गवई (तबला), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), राधिका हेगडे, प्रिती पंढरपूरकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार दीपक देसाई, सरिता देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. तर मान्यवरांचा सत्कार कोषाध्यक्ष डॉ. मोहन उजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद कुलकण यांनी केले.
डॉ. संजीव शेंडे यांनी ठुमरी, दादरा, होरी या गीत प्रकाराचा पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्यानिमित्त डॉ. शेंडे यांचा तसेच संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त गोविंदराव बेडेकर यांचा सत्कार उद्योजक दीपक देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संजीव शेंडे म्हणाले, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे कार्य पंडित प्रमोद मराठे व परिणिता मराठे यांनी उच्च कोटीला नेऊन ठेवले आहे. या महाविद्यालयात कलाकाराची उत्तम जडण-घडण होते. ठुमरी, दादरा, होरी या गीत प्रकाराचा प्रसार करण्यात माझा खारीचा वाटा आहे. उपशास्त्रीय संगीत शिकताना शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असावा लागतो तसेच या गीत प्रकारांचा बाज वेगळा असल्याने ब्रज, उर्दू अशा भाषांचा लहेजाही शिकणे आवश्यक असते. गोविंदराव बेडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी दीपक देसाई म्हणाले, भारतीय शास्त्रीय संगीताचा दबदबा जगभरात निर्माण झाला आहे. हे संगीत मनाला भुरळ घालते. संगीतातून भावनांचे प्रकटीकरण होते तसेच ताण-तणाव, शारीरिक वेदनांमधून आराम मिळतो. या मुळेच संगीत हे मानवासाठी मोठे वरदान ठरले आहे.
——————————-–-–———————––—
जाहिरात