गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त
‘टप्पा, तराणा, त्रिवट, चतरंग, ठुमरी, दादरा’ गायन-वादन समारोहाचे आयोजन.!!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळ संचलित गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 92व्या वर्धापनदिनानिमित्त ‘टप्पा, तराणा, त्रिवट, चतरंग, ठुमरी, दादरा’ या गायन-वादनाच्या विशेष समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 12 मे या कालावधीत गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात हा समारोह होणार आहे.
गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना दि. 8 मे 1932 रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर झाली. अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून तीन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
समारोहाच्या पहिल्या दिवशी (दि. 10) सौ. शाश्वती मंडल आणि पं. विजय कोपरकर यांचे गायन होणार आहे. समारोहाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 11) सौ. रेवा नातू यांचे गायन तर डॉ. अरविंद थत्ते यांचे स्वतंत्र संवादिनी वादन होणार आहे. दुसऱ्या दिवसाचा समारोप सौ. कल्पना झोकरकर यांच्या गायनाने होणार आहे.
सौ. अपर्णा केळकर यांच्या गायनाने समारोहाच्या तिसऱ्या दिवसाची (दि. 12) सुरुवात होणार असून त्यानंतर पं. प्रमोद मराठे व रोहित मराठे यांचे स्वतंत्र संवादिनी वादन होणार आहे. समारोहाची सांगता सौ. सावनी शेंडे यांच्या गायनाने होणार आहे. कलाकारांना भरत कामत, प्रशांत पांडव, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकण, राहुल गोळे, अरुण गवई, लीलाधर चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर, विवेक भालेराव यांची साथसंगत असणार आहे.
तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे रीना झा-त्रिपाठी यांच्या हस्ते होणार आहे. दि. 11 रोजी बडवे इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका सौ. सुप्रिया बडवे यांची तर दि. 12 रोजी उद्योजक दीपक देसाई व सौ. सरिता देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संगीत समारोहाची सुरुवात तीनही दिवस सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
सावनी आणि बेला शेंडे यांचे वडिल डॉ. संजीव शेंडे यांनी ठुमरी, दादरा, होरी या गीत प्रकाराचा पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्यानिमित्त डॉ. शेंडे यांचा तसेच संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त गोविंदराव बेडेकर यांचा रविवारी (दि. 12) संगीत समारोहात सत्कार करण्यात येणार आहे.
समारोहात ‘टप्पा, तराणा, त्रिवट, चतरंग, ठुमरी, दादरा’ सादरीकरणाचे प्रमाण कमी होत आहे. विदुषी शोभा गुर्टू यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने ठुमरी, दादरा, झुला हे प्रकार ऐकायला मिळणार आहेत.
विदुषी मालिनीताई राजुरकर यांचा काही रचना डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडून तर विदुषी विणा सहस्त्रबुद्धे यांचे काही तराणे पंडित प्रमोद मराठे यांच्याकडून संवादिनीवर ऐकायला मिळणार आहेत.
जाहिरात