गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गुढीपाडव्यानिमित्त स्कॉटलंड, इंग्लंडमध्ये
निकिता मोघे यांच्या
पायलवृंदतर्फे ‘नृत्यरंग’
पुणे : ढोलकीच्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणाऱ्या लावणीसह कथक पंजाबी, गुजराथी, राजस्थानी तसेच बॉलिवुड नृत्याचा समावेश असलेला बहारदार असा ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम इंग्लंडमध्ये सादर होणार आहे. ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळांनी पुण्यातील निकिता मोघे यांच्या पायलवृंद संस्थेला निमंत्रित केले आहे. प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनिस, नुपूर दैठणकर, अभिनेत्री हेमांगी कवी, नृत्यांगना ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील या लोकप्रिय कलावंतांचा कार्यक्रमात सहभाग आहे.
गुढीपाडव्याचे निमित्त साधून महाराष्ट्र मंडळ स्कॉटलंड, इप्स्विच मराठी मंडळ लंडन आणि इस्ट मिडलॅन्ड असोसिएशन लेस्टर येथे महाराष्ट्रीयन लोकांसाठी ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. 19 एप्रिल रोजी ग्लास्गो (स्कॉटलंड) येथे, दि. 20 एप्रिल रोजी इप्स्विच (इंग्लंड) येथे तर दि. 21 एप्रिल रोजी लेस्टर (इंग्लंड) येथे ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती निकिता मोघेज् पायलवृंदच्या संचालिका निकिता मोघे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मराठी व हिंदी चित्रपटातील गीतांवर आधारित दृकश्राव्य नृत्याविष्कार व नृत्यातील विविध रंग दर्शविणाऱ्या ‘नृत्यरंग’ या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांची आहे. कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी सुनील महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक लोक परदेशात वास्तव्यास आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे, महाराष्ट्रीयन संस्कृत जपण्याचे बहुमूल्य काम तेथील महाराष्ट्र मंडळांतर्फे केले जाते.
गुढीपाडव्याचे निमित्त साधून तीन ठिकाणी ‘नृत्यरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नृत्यरंग’ या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांचाही सहभाग असणार आहे. गणेशवंदना, जोगवा, लावणी, मुगल काळातील मुजरा, पंजाबी भांगडा, गुजराथी गरबा, कथक-लावणी जुगलबंदी असे नृत्याचे विविध प्रकार सादर केले जाणार आहे. बॉलिवुड तसेच पाश्चात्य नृत्यप्रकारची झलक या निमित्ताने दाखविली जाणार आहे.
गुढीपाडवा, दिवाळीनिमित्त महाराष्ट्र मंडळांतर्फे नाटक तसेच सांगीतिक कार्यक्रम दरवर्षी सादर केले जातात. विविध रंगी नृत्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर होणार आहे. महाराष्ट्र मंडळांचे डॉ. नितीन पटवर्धन, संदीप जोशी, अजय दीक्षित, हर्षद जोशी, डॉ. प्रवीण देसाई, राम नाफडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे.
आयोजनाविषयी माहिती देताना संदीप जोशी म्हणाले, गुढीपाडवा, दिवाळीनिमित्त महाराष्ट्र मंडळातर्फेदरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी लोकांनी एकत्र यावे हा त्यामागील हेतू असतो. गेल्या दहा वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकारांना आमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम सादर केले जातात. नृत्यावर आधारित कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे.
जाहिरात