गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘मज झाली सावळ बाधा.. मी झाले ना रे राधा’ !!
पुणे : राधा अन् कृष्णाचे अपरिपक्वतेतून परिपक्वतेपर्यंत प्रवाहित झालेले नाते, अल्लड वयात मातृत्व पेलणाऱ्या आणि पुढे राजमातेचे आयुष्य जगणाऱ्या कुंतीचे कृष्णाशी असलेले अनुबंध तर कृष्णसख्याला साद घालणारी द्रौपदी यांचे भावविश्व उलगडले ते ‘कृष्णकिनारा.. त्या तिघी..’ या नृत्यनाट्य आणि अभिवाचनाच्या अनोख्या संगमातून.
राधा, कुंती आणि द्रौपदीच्या आयुष्यातील प्रसंग नृत्याद्वारे साकारताना कलाकार.
लेखीक अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्णकिनारा’ या साहित्यकृतीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण असा हा कार्यक्रम शुक्रवारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. अरुणा ढेरे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू मनिषा साठे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर, स्मिता महाजन, स्वाती दातार, तेजस्विनी साठे यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मज झाली सावळ बाधा.. मी झाले ना रे राधा’ असे राधा आणि कृष्ण यांचे अल्लड वयातील फुललेले प्रेम, राधेचे कृष्णमय होणे, कृष्णाने गोकुळ सोडल्यानंतर राधेच्या भावविश्वात झालेली उलथापालथ आणि उतार वयात राधा-कृष्णाची झालेली प्रगल्भ भेट याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
राजकन्या कुंती लहान वयातच दत्तक दिली गेली यामुळे तिच्या मनावर झालेले आघात तसेच अपरिपक्व वयातील मातृत्व, जे ती उघडपणे स्वीकारू शकली नाही त्यामुळे झालेला अपत्य विरह, पुढील आयुष्यात पत्नी, राजमाता इ. भूमिका निभावताना आलेले कठीण प्रसंग. द्रौपदीच्या मनाची उलघाल समजून घेतली तरी तिला मार्ग न दाखवू शकणारी कुंती कलाकरांनी ताकदीने उभी केली.
द्रौपदीच्या आयुष्यातील प्रसंग दर्शविताना अर्जुनासह विवाहप्रसंगी कृष्णाशी जडलेले सख्याचे नाते, पाच पतींची पत्नी म्हणून भोगावी लागलेली अवहेलना, अर्जुनाने केलेल्या इतर विवाहांमुळे दुखावलेली द्रौपदी, द्युताच्या खेळात पणाला लागलेली असताना कृष्णसख्याने वाचविलेली अब्रु, त्यासाठी तिने केलेला धावा असे प्रसंग अभिवाचन आणि नृत्यनाट्याच्या आविष्कारातून रसिकांसमोर उलगडत गेले.
मृण्मयी कुलकर्णी, भक्ती झळकी-कुलकर्णी, उत्कर्षा दगडे, ऐश्वर्या साने-थत्ते, कल्याणी सवडकर, मानसी भागवत आणि मैथिली पुंडलिक यांनी कथक नृत्याविष्कारातून राधा, कुंती आणि द्रौपदी यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग साकारले.
काव्यात्मक गद्य अशा स्वरूपात असलेल्या लिखाणातील गद्य भाग वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सशक्त अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केला. मृण्मयी कुलकर्णी यांचे दिग्दर्शन होते. पहिल्याच नृत्यनाट्य अभिवाचनाच्या या अनोख्या प्रयोगास रसिकांनी भरभरून दाद दिली.
अरुणा ढेरे म्हणाल्या, कृष्णाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून कल्पनेतल्या कथेतील पात्रांना प्रत्यक्ष समजत मांडणी केली आहे. हे सादरीकरण म्हणजे माध्यमांतर आहे. अरुणा ढेरे यांचे स्वागत मनिषा साठे यांनी केले. कार्यक्रमाविषयीची माहिती मृण्मयी कुलकर्णी यांनी दिली तर आभार भक्ती झळकी-कुलकर्णी यांनी मानले.
————————————————————–जाहिरात