गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आप्त आपटे सेवा कार्य समितीतर्फे व्याडेश्वर येथे उभारणार भक्तनिवास.!!
गुढीपाडव्यानिमित्त रविवारी श्रीधर फडके यांचा ‘बाबूजी आणि मी’ सांगीतिक कार्यक्रम
पुणे : महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात समस्त आपटे सभासदांसाठी कार्यरत असलेल्या आप्त आपटे सेवा कार्य समितीच्या वतीने गुहागर येथील श्री क्षेत्र व्याडेश्वर येथे श्री व्याडेश्वर भक्तांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असलेले भक्तनिवास बांधण्यात येणार असल्याची माहिती आप्त आपटे सेवा कार्य समितीचे अध्यक्ष अनिल आपटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष महेश आपटे, संपर्क प्रमुख आरती आपटे उपस्थित होते. आप्त आपटे सेवा कार्य समिती 1999 पासून समस्त बंधू भगिनींसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे समितीचे समस्त सभासद यांच्यात विविध प्रकारे परस्पर सांस्कृतिक आणि आर्थिक ऐक्य आणणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. समितीकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच उच्च शिक्षणासाठी परतफेड स्वरूपात कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते.
आनंदाश्रम संस्थेमध्ये परगावाहून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय माफक दरात केली जाते.इ.स. 1914 मध्ये चित्पावन ब्राह्मण आपटे घराण्याचा पहिला कुलवृत्तान्त कै. गोविंद विनायक आपटे यांच्या अथक परिश्रमातून प्रसिद्ध झाला. 2014 पर्यंतची माहिती यात अद्ययावत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एका ब्राह्मण कुळाचा कुलवृत्तान्त लिहावा व त्याची सुरुवातही स्वतःच्या आपटे कुळापासून करावी, ही विलक्षण संकल्पना त्यांच्याच पुढाकारातून साकार झाली.
आप्त आपटे सेवा कार्य समितीच्या वतीने विविध प्रांतातील आपटे मंडळींना एकत्र आणण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये आपटे कुलसंमेलन भरविले जाते. बऱ्याच चित्पावन ब्राह्मणांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र व्याडेश्वर, गुहागर येथे सर्व सोयींनी सुसज्ज असे भक्त निवास बांधण्याचे समितीचे प्रयोजन आहे.
या भक्त निवासामुळे सर्व व्याडेश्वर भक्तांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था माफक दरात केली जाणार आहे. सुमारे दहा हजार क्षेत्रफळात हे भक्त निवास उभारण्यात येणार असून येथे 20 खोल्या, भोजनगृह असणार आहेत. भविष्यात वेदपाठशाळा, गोशाळा उभारण्याचाही मानस आहे. गुहागर हे पर्यटन क्षेत्र असल्याने या भक्तनिवासाचा उपयोग पर्यटकांनाही करता येणार आहे.
श्रीधर फडके यांचा रविवारी ‘बाबूजी आणि मी’ सांगीतिक कार्यक्रमहा भक्त निवास बांधण्याचा प्रकल्प बराच खर्चिक आहे. त्यामुळे या नियोजित प्रकल्पाच्या निधी संकलनासाठी हातभार म्हणून समितीने रविवार, दि. 07 एप्रिल 2024 रोजी सकाळी 06.30 वाजता मजेंटा लॉन्स, एरंडवणे, पुणे येथे सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा ‘बाबूजी आणि मी’ हा सांगीतिक कार्यक्रम गुढीपाडवा पहाटच्या निमित्ताने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाची देणगी प्रवेशिका केवळ तीनशे रुपये असून यातून जमा होणारा निधी व्याडेश्वर येथील भक्त निवास प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.
————/———————/—————-/———-
जाहिरात