Marathi FM Radio
Wednesday, February 5, 2025

पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला पुण्यात !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला पुण्यात !!

साहित्यिक चर्चा, परिसंवाद, मुलाखती, गप्पांबरोबरच संगीत नाटकाचा रंगणार प्रयोग

गदिमांच्या गीतांवर ‌‘अमृतसंचय‌’ सांगीतिक कार्यक्रम
पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष तर विनोद जाधव स्वागताध्यक्ष

रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने शि. द. फडणीस यांचा होणार विशेष गौरव

Advertisement

पुणे : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवार, दि. 4 जानेवारी आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन, समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कविसंमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे.

Advertisement

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय संमेलन होणार असून संमेनलाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, मराठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे, ती प्रवाहित राहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी प्रांतपाल शितल शहा, संयोजन समिती कार्याध्यक्ष राजीव बर्वे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

Advertisement

सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज हे या मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य यजमान असून पुण्यातील 15 रोटरी क्लब सहयजमान आहेत. पत्रकार परिषदेला डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मोहन चौबळ यांची उपस्थिती होती.
शनिवारी (दि. 4) सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यात रोटरियन्सचा सहभाग असणार आहे. सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी गणेशवंदना सादर करणार आहेत.

Advertisement

सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


उद्घाटन समारंभानंतर सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वैशाली वेर्णेकर, अभय जबडे हे विश्वास पाटील यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी 2:30 वाजता योगेश सोमण लिखित ‌‘ट्रेनिंग‌’ हे प्रहसन अविनाश ओगले आणि लीना गोगटे सादर करणार आहेत. दुपारी 2:45 वाजता ज्येष्ठ साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘यशस्वी लेखनाची सूत्रे‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे, साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे.

त्यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत. दुपारी 4:15 वाजता संजय डोळे लिखित ‌‘मन:शांती‌’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर, सुनिता ओगले सादर करणार आहेत. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आले असून यात अंकाजी पाटील, विजय पुराणिक, सुप्रिया जोगदेव, स्नेहल भट, ममता कोल्हटकर, डॉ. अश्विनी गणपुले, नीता केळकर, जयश्री कुबेर, डॉ. आनंदा कंक, राहुल लाळे, मुरलीधर रेमाणे, शशिकांत शिंदे, प्रदीप खेडकर, हर्षदा बावनकर, तनुजा खेर यांचा सहभाग आहे.

संयोजन निनाद जोग करणार असून सूत्रसंचालन डॉ. अंजली कुलकर्णी करणार आहेत. रात्री 8:30 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‌‘संगीत कट्यार काळजात घुसली‌’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असून अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, अथर्व आठल्ये, प्रज्ञा देसाई यांची साथसंगत असणार आहे.


रविवारी (दि. 5) सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी शिववंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून प्रा. मिलिंद जोशी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता सुप्रिया जोगदेव लिखित ‌‘ऑफिस ऑफिस‌’ हे प्रहसन शंतनु खुर्जेकर, अविनाश ओगले सादर करणार आहेत.

माजी प्रांतपाल, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे, डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3:45 वाजता संजय डोळे लिखित ‌‘आगलावे वि. पेटवे‌’ हे प्रहसन संजय डोळे, पूजा गिरी, राजेंद्र उत्तुरकर, मधुर डोलारे सादर करणार आहेत.

दुपारी 4 वाजता ‌‘अमृतसंचय‌’ हा ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुग्धा ढोले, आसावरी गोडबोले, दीपक महाजन, श्रीकांत बेडेकर गीते सादर करणार आहेत. अनिल गोडे, मिलिंद गुणे, मिहिर भडकमकर, सचिन वाघमारे, स्वयम्‌‍ सोनावणे, रोहित साने साथसंगत करणार आहेत. संयोजन मनिषा अधिकारी यांचे असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत.


सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि ‌‘असत्यमेव जयते‌’चे लेखक अभिजित जोग यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular