गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘दिलीपराज‘ ग्रंथोत्सव 15 मार्च पासून !
महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये आयोजन : 300 पेक्षा अधिक पुस्तकांवर घसघशीत सवलत!!
पुणे : महाराष्ट्रातील आघाडीची प्रकाशन संस्था दिलीपराज प्रकाशनतर्फे ग्रंथप्रेमींसाठी प्रथमच ‘दिलीपराज ग्रंथोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 मार्च ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत पुण्यासह महाराष्ट्रातील 16 शहरांमधील प्रमुख विक्रेत्यांकडे हा महोत्सव भरविण्यात येणार आहे.
महोत्सवात दिलीपराज प्रकाशनाची निवडक 300 हून अधिक पुस्तके 35 टक्केपर्यंत सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्य, इतिहास, कथा, कादंबरी, माहितीपर, राजकीय, विज्ञान, बालसाहित्य आणि इतर अनेक विषयांवरील पुस्तकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नामांकित ग्रंथ विक्रेत्यांकडे एकाच वेळी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, कराड, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, अलिबाग, नांदेड, जळगाव, धुळे, सांगली, चिपळूण येथील प्रमुख विक्रेत्यांकडे दिलीपराज प्रकाशनची पुस्तके उपलब्ध असणार आहेत. पुण्यातील रसिक साहित्य, पाटील एन्टरप्रायजेस, पुस्तक पेठ, माय विश्व यांच्याकडे पुस्तके मिळणार आहेत.
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, वाचन संस्कृती टिकून रहावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचावीत, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
ग्रंथखरेदीत 35 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याने ‘दिलीपराज ग्रंथोत्सव 2025’ पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे, असे दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
दिलीपराज प्रकाशनविषयी …
दिलीपराज प्रकाशन ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था असून गेल्या 54 वर्षांपासून दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. दिलीपराज प्रकाशन संस्थेला 135 हून अधिक राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सम्मान, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले असून असे मानाचे पुरस्कार मिळविणारी मराठी पुस्तक विश्वातील दिलीपराज ही एकमेव संस्था आहे. संस्थेने आत्तापर्यंत जवळपास 3000 पुस्तके प्रकाशित केली आहेत.