गोल्डन आय न्यूज नेटवर्क
परदेशी विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरी केली दिवाळी !
आयसीसीआर आणि सिम्बायोसिस विश्व विद्यालयातर्फे आयोजन !
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून (आयसीसीआर) जगाच्या पाठीवरील 13 देशांमधून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी दिवाळी अर्थात दिपोत्सवाचे महत्त्व जाणून घेत या चैतन्यदायी भारतीय सणाचा आनंद लुटला.
दिवाळी साजरी करताना परदेसी विद्यार्थी
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 6) सायंकाळी सिम्बायोसिस विश्व विद्यालयाच्या आवारात या आनंददायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, कार्यक्रम अधिकारी संजिवनी स्वामी, आयसीसीआरच्या प्रादेशिक सल्लागार समितीच्या सदस्या कल्याणी साळेकर, लीना आढाव तसेच सिम्बायोसिस विश्व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, संजिवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर यांची विशेष उपस्थिती होती.
अफगाणिस्तान, कंबोडिया, फिजी, इंडोनेशिया, मालदिव, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इथोपिया, बोत्सव्हाना अशा विविध देशांतील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांनी भाषेच्या, परंपरेच्या, संस्कृतीच्या सीमा ओलांडत दिवाळी या भारतीय सणाचे महत्त्व जाणून घेतले. विशेष म्हणजे आपापल्या देशातील पारंपरिक वेष परिधान करीत तर काही विद्यार्थी कौतुकाने भारतीय पेहरावात या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
विद्यार्थिनींनी भाऊबिजेच्या मागील भावना समजावून घेत विद्यार्थ्यांचे औक्षण केले.आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी भारतीय सणांचे महत्त्व विशद करीत विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, परदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना घरापासून तुटलेपण जाणवू नये, त्यांची काळजी घ्यावी म्हणून या प्रकाश उत्सवात सामावून घेत आहोत.
विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आतषबाजीचाही आनंद लुटला.
जाहिरात