गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘बहुरूपी भारूडा’चा नव्या संचात पुन:प्रारंभ
डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे 14 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम !!
डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘लोककलेतील गण’ पुस्तकाचेही होणार प्रकाशन !
पुणे : संत साहित्याचे अभ्यासक वै. डॉ. रामचंद्र देखणे यांनी बहुरूपी भारूडाचे देश-विदेशात अडीचहजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. डॉ. देखणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे ‘बहुरूपी भारूड’ या कार्यक्रमाचा नवीन 25 कलाकारांच्या संचात पुन:प्रारंभ करण्यात येत आहे. तसेच ‘लोककलेतील गण’ या डॉ. देखणे लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑडिटोरिअम, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.
डॉ. रामचंद्र देखणे
डॉ. रामचंद्र देखणे यांची आतापर्यंत 51 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे अखेरचे पुस्तक ‘लोककलेतील गण’ विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे याच कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार असून प्रकाशन अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष प. पू. डॉ. बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांच्या हस्ते होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असून खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. पहिल्या विश्वात्मक संत साहित्याचे अध्यक्ष, केंद्र सरकारच्या कंपनी विधी न्यायाधीकरणाचे न्यायिक अधिकारी डॉ. मदन महाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख वक्ते आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, विश्वकर्मा पब्लिकेशनचे उपसंपादक संदीप तापकीर यांचीही उपस्थिती असणार आहे.
डॉ. भावार्थ देखणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘बहुरूपी भारूड’चे अडीचहजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही हे प्रयोग गाजले आहेत. समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे अंग असलेल्या या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे, डॉ. रामचंद्र देखणे यांच्या स्मृती त्यांनी उभारलेल्या कार्यातून पुढे न्याव्यात या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या लोककलांची परंपरा जतन करत त्या प्रवाहित ठेवणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ‘बहुरूपी भारूड’ सादर करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित तरुण, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणारे अवधूत गांधी यांचा सहभाग आहे. आधीच्या संचातील काही कलाकारांचाही यात समावेश आहे.
प्रतिष्ठानतर्फे लोककलांवर आधारित कार्यक्रम, चर्चासत्रे, पुरस्कार वितरण तसेच दिंडीत सेवा देणाऱ्यांचा गौरव, व्याख्यानमाला असे विविध उपक्रम आयोजित केले जाणार असल्याचे डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.
जाहिरात