गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्पर्धकांनी सादर केलेल्या रचनांमधून पांडुरंग आणि रखुमाईचे दर्शन घडले : खासदार शरदचंद्र पवार यांच्या भावना !!
संतसेवा भजनी मंडळ आणि विठ्ठल भजनी मंडळाला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज महाकरंडक
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या अभंग व भजन स्पर्धेचे खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण !
पाणी टंचाई निवारणाचा संदेश देत स्वच्छतेविषयी स्पर्धकांनी स्वरचित रचनांमधून केला जागार !!
पुणे : पाणी टंचाई, अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे समाजात अनेक प्रकारची रोगराई पसरत आहे. या ज्वलंत प्रश्नांना स्पर्धकांनी स्वरचित रचनांमधून वाचा फोडली आहे. अशा प्रकारची स्पर्धा क्वचितच पहायला मिळते. लहान मुला-मुलींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती होण्यास नक्कची मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून स्पर्धकांनी सादर केलेल्या संतरचनांमधून येथे पांडुरंग आणि रखुमाईचे दर्शन घडलेे, अशी भावना ज्येष्ठ नेते, खासदार शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली.
‘पाणी बचत’ आणि ‘सार्वजनिक स्वच्छता’ या संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या जगद्गुरू श्री संत तुकराम महाराज अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संतसेवा भजनी मंडळ, मुळशी आणि विठ्ठल भजनी मंडळ, निमगाव केतकी या संघांना ज्येष्ठ नेते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज महाकरंडक, प्रमाणपत्र व एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या वेळी उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, स्पर्धा प्रमुख पंडित रघुनाथ खंडाळकर, काका चव्हाण, पंडित रघुनाथ खंडाळकर, ज्ञानदेव शिंदे, सचिन इंगळे, राजेंद्र दूरकर, अपर्णा संत आदी.
स्पर्धेची महाअंतिम फेरी आज (दि. 14) निसर्ग कार्यालय, मार्केट यार्ड येथे घेण्यात आली. अंतिम फेरीत 28 संघांचे सादरीकरण झाले. अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या संघांना पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, स्पर्धा प्रमुख पंडित रघुनंदन खंडाळकर, काका चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धकांचे लक्षवेधी सादरीकरण बघून प्रथम तीनही क्रमांकांना विभागून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेत संतसेवा भजनी मंडळ, मुळशी आणि विठ्ठल भजनी मंडळ, निमगाव केतकी या संघांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज महाकरंडक, प्रमाणपत्र व एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेत द्वितीय आलेल्या स्वरसंगीत भजनी मंडळ, धनकवडी आणि शारदा संगीत विद्यालय, बारामतीच्या संघास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज करंडक, प्रमाणपत्र व 71हजार रुपये रोख पारितोषिक तर तृतीय क्रमांक मिळालेल्या पेशकार म्युझिक अकॅडमी, बारामती आणि भैरवनाथ भजनी मंडळ, चांबळी या संघांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज करंडक, प्रमाणपत्र व 51 हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले.
गणेश भजनी मंडळ, राजापूर, मेघमल्हार संगीत विद्यालय, सासवड, माऊली संगीत भजनी मंडळ, करंदी, रागेश्री संगीत साधना विद्यालय, बिबवेवाडी आणि स्वरसाधना महिला भजनी मंडळ, आंबेगाव पठार या पाच संघांना प्रत्येकी 11 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक, करंडक व प्रमाणपत्र देण्यात आले. ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र दूरकर, सचिन इंगळे, अपर्णा संत यांनी अंतिम स्पर्धेचे परिक्षण केले.
बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तालुके आणि पुणे शहर अशा आठ विभागात स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या 403 संघांमधून अंतिम फेरीसाठी 28 संघांची निवड करण्यात आली होती.
लहान स्पर्धकांनी काही रचना सादर कराण्याची विनंती खासदार शरदचंद्र पवार यांनी केल्यानंतर स्पर्धेत सहभागी लहान मुलींनी उत्साहाने रचना सादर केल्या. त्याला शरदचंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
पाणी टंचाई आणि स्वच्छता या विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला जावा आणि समाजजीवन आरोग्यपूर्ण रहावे, जागृती व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धेच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविकात दिली. आठ विभागात घेण्यात आलेल्या स्पर्धेत मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
स्पर्धा प्रमुख पंडित रघुनाथ खंडाळकर म्हणाले, पाणी बचत आणि स्वच्छतेचा संदेश स्पर्धेच्या माध्यमातून दिला हा नवीन प्रयोग होता. पाणी बचत आणि स्वच्छतेबाबत स्पर्धकांनी स्वत: रचना लिहून त्याला चाली लावल्या आणि सादरीकरण केले.
स्पर्धा संयोजक पंडित रघुनाथ खंडाळकर, विवेक थिटे आणि संदीप राक्षे यांचा सत्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार संदीप राक्षे यांनी मानले.
पंडित रघुनाथ खंडाळकर, स्पर्धा प्रमुख
वीवेक थिटे, संदीप राक्षे, संयोजक
जाहिरात