गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भ्रष्टाचार हा देशाच्या सुरक्षेतील सर्वात मोठा धोका : अविनाश धर्माधिकारी !!
देशाच्या सुरक्षेबाबत ब्रिगेडिअर महाजन यांची पुस्तके मार्गदर्शक : अविनाश धर्माधिकारी !!
पुणे : पाकिस्तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत असलेला भ्रष्टाचार हा भारताच्या सुरक्षितेतील सर्वात मोठा धोका आहे. भ्रष्ट चारित्र्य आणि अमर्यादित स्वार्थ यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदांवर चारित्र्यवान व्यक्ती असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा चाणाक्य मंडल परिवाराचे संस्थापक, निवृत्त आएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अनुबंध प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात (डावीकडून) अविनाश धर्माधिकारी, हेमंत महाजन, किरण ठाकूर, प्रदीप रावत आणि अनिल कुलकर्णी.
जगात पसरलेल्या नक्षलवाद आणि इस्लामवादाचा धोका जगाबरोबरच भारतालाही आहे. नक्षलवादी हे चीनचे तर इस्लामवादी हे पाकिस्तान आणि बांगलादेशाचे हस्तक आहेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
अनुबंध प्रकाशनतर्फे ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या ‘भारताची सागरी सुरक्षा : आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ या भाग 1, भाग 2, भाग 3 या तीन पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी (दि. 28) धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
बेळगाव तरुण भारतचे समूह सल्लागार किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर नॅशनल शिपिंग बोर्डचे माजी अध्यक्ष प्रदीप रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी मंचवार होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
धर्माधिकारी पुढे म्हणाले, आजच्या काळात सैन्याच्या माध्यमातूनच केवळ युद्धे लढली जात नाही तर तंत्रज्ञानाचा आधार घेऊन युद्धनिती रचल्या जात आहेत. एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी देशातील जनतेने एक होणे आवश्यक आहे. तेव्हाच राष्ट्रीयत्व बळकट होईल. देशाच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण अवलंबिले गेले पाहिजे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केलेल्या उपाययोजांनी माहिती ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या पुस्तकातून मिळत असून त्याचे संपूर्ण जीवन भारताच्या सुरक्षेच्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी वाहिलेले आहे.
पुस्तक लिखाणामागील भूमिका विशद करताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सागरी सुरक्षेचा इतिहास, वर्तमानातील धोके, राष्ट्रीय सुरक्षा, महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य आणि अंतर्गत धोके, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक, समुद्री परिस्थिती, पायाभूत सुविधा, नियोजन, वित्त व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवर लिखाण केले असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना किरण ठाकूर म्हणाले, ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे व्याख्याने, लेखमाला, पुस्तके अशा विविध माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. ते पुढे म्हणाले, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्या-राज्यांनी एकत्रितरित्या विचार न केल्यास भविष्यात धोके वाढण्याची भीती आहे.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्रीय धोरणात बदल झाले आहेत. देशासमोरील धोके ओळखून सैन्य दलांना अत्याधुनिक युद्ध सामुग्री मिळणे आवश्यक आहे.
देशाला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा लाभला असूनही सागरी सत्ता बनण्याची आकांक्षा नव्हती असे सांगून प्रदीप रावत म्हणाले, त्यामुळे समुद्रमार्गे भारतावर अनेक आक्रमणे झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सत्ता बनण्याचे आत्मभान जागृत केले. ते पुढे म्हणाले, समुद्रामार्गे आज देशाची कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत होत असलेले धोरणात्मक बदल आश्वासक वाटत आहेत.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करून अनिल कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार अस्मिता कुलकर्णी यांनी मानले.