रिपोर्टर -प्रसन्ना पाध्ये :
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे पुणे येथे पारितोषिक वितरण समारंभ
परिसंवाद, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलनातही विनोदी लेखन तसेच लेखकाला सापत्न वागणूक मिळते. साहित्याच्या मंडपात विनोदी लेखन करणाऱ्यास दुसऱ्या पंगतीत बसविले जाते, अशी खंत प्रख्यात लेखक श्रीनिवास भणगे यांनी व्यक्त केली. या परिस्थितीवर गंभीरपणे चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज भणगे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
वास्तूप्रसादचे प्रसाद शिवरकर, सुप्रसिद्ध लेखक श्रीनिवास भणगे , स्पर्धेचे परिक्षक प्रसिद्ध निवेदक राजेश दामले, युवा नाट्यकर्मी अक्षय वाटवे, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन व्यासपीठावर होते.
स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. अभिनेत्री माधवी सोमण, ऋग्वेद सोमण आणि मधुरा आगरकर-टापरे यांची विशेष उपस्थिती होती.
विनोदी लेखन म्हणजे पोरकटपणा नसून विनोदबुद्धी जागृत असणे हा लेखकाकडील मोठा गुण असे सांगून भणगे म्हणाले, विनोदबुद्धी या गुणामुळे व्यक्तीचे जगणे सुसह्य होते. विनोदाकडे पोरकटपणा किंवा करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते; परंतु विनोद हा विसंगतीतून निर्माण होतो. विनोदाचा आत्मा गंभीर आहे हे लक्षात घेतले जात नाही. ते पुढे म्हणाले, विनोदाकडे गंभीरपणे पाहिले तर त्यातून खरा विनोद सापडेल. विनोदी लेखक, वाचक असा शिक्का असणारा दृष्टीदोष साफ केला पाहिजे तरच विनोदी लेखनाच्या क्षेत्रात प्रगती होईल.
राजेश दामले म्हणाले, विनोदी लेखन करणे सोपी गोष्ट नाही. अशा पद्धतीचे लेखन करणाऱ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. सद्यस्थितीत घडणारा विनोद हा अस्सल विनोद नाही. विनोदी लेखन करताना संहितेची मांडणी, कथेतील प्रसंगी फुलविणे, व्यक्तिरेखा यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
अक्षय वाटवे म्हणाले, वाचकाला रडविणे सोपे असते पण हसविणे ही अवघड गोष्ट आहे. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाने आपल्या लिखाणाचे परिक्षण करणे, कथा बांधिव असणे गरजेचे आहे. स्वत:ला कोणती लेखनशैली आवडते हे समजून घेऊन लिखाण करणे अपेक्षित आहे.
वास्तुप्रसाद चे प्रसाद शिवरकर यांनी कल्पना शक्ती वाढवून चांगले लेखन होण्यासाठी जन्मपत्रिका व आपली वास्तू कशा प्रकारे मदत करू शकते हे सांगितले.
लेखकामध्ये लेखन ही कला उपजतच असते म्हणजेच तो जन्मपत्रिकेतील एक प्रकारचा योगच असतो जो प्रयत्नाने वाढू शकतो असे सांगितले.
तसेच वास्तुशास्त्राच्या विविध नियमांद्वारे कशा प्रकारे एक लेखक हा यशस्वी लेखक होण्यासाठी मदत होऊ शकते हे सांगितले.
सुरुवातीस फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती विजय पटवर्धन यांनी दिली.
मान्यवरांचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – प्रथम क्रमांक – विजय पटवर्धन पुरस्कृत निर्मला श्रीनिवास स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपये रोख – अपर्णा मोडक (राजकारणाचा लाडू).
द्वितीय क्रमांक – वसुधा क्रिएशन पुरस्कृत मंदार वामन आगरकर स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये रोख – योगेश शिंदे (वडा-पाव).
तृतीय क्रमांक – योगेश सोमण पुरस्कृत अभिजित सोमण स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि दोन हजार रुपये रोख – अभयकुमार कुलकर्णी (कदर).
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पुरस्कारार्थी यांच्या समवेत अक्षय वाटवे, प्रसाद शिवरकर, श्रीनिवास भणगे, राजेश दामले, माधवी सोमण, विजय पटवर्धन, मधुरा आगरकर-टापरे
————————————————
Adv.