Reporter – Prasanna Padhye :
प्रभातस्वरच्या मंचावर पुणेकरांनी प्रथमच अनुभवले उत्तर हिंदुस्थानी-कर्नाटकी सहगायन
श्रीराम परशुराम-संजीव चिम्मलगी यांच्या सादरीकरणाने रसिक स्तिमीत
उत्तर हिंदुस्थानी-कर्नाटकी सहगायनाची रंगली प्रभातस्वर मैफल
पुणे : उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी गायकीचा मिलाफ असलेले सहगायन पुणेकर रसिकांनी प्रभातस्वरच्या स्वरमंचावर प्रथमच अनुभवले. श्रीराम परशुराम (चेन्नई) आणि संजीव चिम्मलगी (वाशी) या कलाकारांनी दोन्ही गायन शैलीतील वैशिष्ट्ये उलगडत केलेल्या सादरीकरणाने श्रोते केवळ स्तिमीतच झाले नाही तर अनोख्या मैफलीचे साक्षीदार होता आल्याचा आनंद घेऊन समाधानी झाले.
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफलीचे डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या आवारात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीचे निमित्त साधून श्रीराम परशुराम आणि संजीव चिम्मलगी यांनी मैफलीची सुरुवात भैरव रागातील पंडित कुमार गंधर्व रचित शोभे जटा तेरो या बंदिशीने केली. या बंदिशीला जोडून पंडित रविशंकर रचित शंकर श्री महादेव ही बंदिश सादर करून उगवत्या सूर्याच्या साक्षीने शिवभक्तीचा जागर केला.
यानंतर गानमूर्ती रागातील संत त्यागराज यांची गानमूर्ते श्रीकृष्ण वेणू ही कर्नाटकी गायन शैलीतील रचना सादर केली. मलय मरुतम् म्हणजे सुगंधी वारा या रागाला जवळ जाणारी सगेरा या पंडित सी आर व्यास निर्मित रागातील ” भयी भोर सुमिर करे तोहे आज अरज मोरी सुनले” तसेच दृत एकतालात निबंध “दरबार सुना तुम बिन दासगुनी” ह्या रचना ऐकवून प्रभातकालीन वातावरण प्रफुल्लीत केले.
कलीयुगात सामान्य माणूस अध्यात्म-भक्ती यात वेळ व्यतित करण्याऐवजी राजस-तामस गुणांमध्ये वेळ दवडत आहे अशा स्वरूपाचा अर्थ असलेली रूपक तालातील त्यागराज यांची तमिळ भाषेतील पण संस्कृत भाषेशी साधर्म्य पावणारी मनसा येटू नोर तसेच नुकत्याच सुरू झालेल्या वसंत ऋतुला समर्पित हिंडोल रागातील नाद विनोदिनी देवादी देव श्री वासुदेव या रचनांनी रसिक प्रभावित झाले. वसंत ऋतुतील भजन परंपरेला साधर्म्य दाखविणारी मृगनयनी को यार नवल रसिया या रचनेतील तबला आणि मृदुंग या तालवाद्यातील जुगलबंदीने मैफलीचा कळसाध्याय गाठला.
श्रीधर पार्थसारथी (मृदंगम), निखिल फाटक (तबला), मंगला वैदनाथन (व्हायोलिन), अमेय बिच्चू (हार्मोनियम), कौशिक केळकर (टाळ), यश वारियर, ओंकार शेणई (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
दोन्ही शास्त्रीय प्रकाराकडे कसे वळलात या मंजिरी धामणकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीराम परशुराम म्हणाले, माझे वास्तव्य मुंबईत असल्याने मी हिंदुस्थानी संगीत आवडीने ऐकत होतो. सुरुवातीस रितसर शिक्षण घेतले नाही परंतु वयाच्या 15व्या वर्षानंतर के. जी. गिंडे यांनी माझ्यातील हिंदुस्थानी संगीत शिकण्याची इच्छा बघून मला पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे शिक्षण घेण्यास उद्युक्त केले. याच प्रश्नावर संजीव चिम्मलगी म्हणाले, मी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे उत्तर हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण घेत असताना एका गुरुपौर्णिमेला श्रीराम परशुराम यांचे व्हायोलिन वादन ऐकले. यातून प्रेरणा घेऊन कर्नाटकी गायनशैली शिकायला सुरुवात केली. गायकांनी दोन्ही गायन शैलीतील वैशिष्ट्ये रसिकांना उलगडून सांगितली.
भारतीय शास्त्रीय संगीत स्थैर्य आणि मन:शांती देणारे आहे, या संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने प्रभातस्वर मैफलीचे आयोजन केले जात असल्याचे प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी या प्रसंगी सांगितले. कलाकारांचे स्वागत अपर्णा काळे, शरद केळकर, सायली पानसे, मकरंद केळकर यांनी केले.
————————————————-
Adv.