गोल्डन आय न्यूज नेटवर्क
खंडाळकर संगीत अकादमीतर्फे ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन !
पुणे : अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्यावतीने शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 मे रोजी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव पर्वती-विद्यानगरी येथील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड जी. के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कै. दादासाहेब केतकर सभागृहात होणार आहे. महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
राजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनाने शनिवारी (दि. 3) महोत्सवास प्रारंभ होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांचे शास्त्रीय गायन होईल. प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा ‘मेलोडीक रिदम’ हा कार्यक्रम होणार आहे. यात शीतल कोलवलकर (कथक), सुरंजन खंडाळकर (गायन), ओमकार दळवी (पखवाज), अमेय बिचू (संवादिनी), सागर पटोकार (पढंत) यांचा सहभाग असणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 4) पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे शिष्य महेश कंटे आणि शंकर गिरी यांचे सहगायन होईल. त्यानंतर यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना मिलिंद कुलकर्णी संवादिनी साथ करतील. कै. विप्रदास चंद्रकांत मेणकर (ज्येष्ठ उद्योजक, संगीतप्रेमी) स्मृती पुरस्काराने पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध वैद्य प्रशांत अनंत सुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महोत्सवाची सांगता विद्यालयाचे संस्थापक अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर, त्यांचे पुत्र व शिष्य सुरंजन आणि शुभम खंडाळकर यांच्या ‘कृष्णरंग’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे. त्यांना अमर ओक (बासरी), अजिंक्य जोशी (तबला), श्रेयस बडवे (निरूपण), पार्थ भूमकर (पखवाज), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), विश्वास कळमकर (तालवाद्य) हे साथसंगत करतील. महोत्सवाच्या दोन्ही दिवसाचे निवेदन मंगेश वाघमारे करणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून मोफत प्रवेशिक कार्यक्रम स्थळी मिळणार आहेत.