गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अन्नपूर्णा देवी यांची सेवा आत्मिक समाधान देणारी : पंडित नित्यानंद हल्दिपूर!!
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे ‘6-अ आकाश गंगा’ लघुपटाचे पुण्यात प्रथमच स्क्रिनिंग!!
पुणे : अत्यंत प्रतिभावान परंतु प्रसिद्धी पराङ्मुख असलेल्या सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांनी शिष्य म्हणून स्वीकारावे या ध्येयाने प्रेरीत होऊन मी अनेक वर्षे यासाठी पाठपुरावा केला. अनेक पातळ्यांवर परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्या स्पष्टवक्त्या असल्या तरी एक गुरू म्हणून अतिशय संयमी होत्या.
त्यांच्या अखेरच्या काळात माझ्या हातून त्यांची घडलेली सेवा हा माझ्या दृष्टीने वेळेचा अपव्यय नव्हता तर ती माझ्यासाठी आत्मिक समाधानाची गोष्ट होती, अशा भावना प्रसिद्ध बासरीवादक पंडित नित्यानंद हल्दिपूर यांनी व्यक्त केल्या.
रसिकांशी संवाद साधताना पंडित नित्यानंद हल्दिपूर आणि निर्मल चंदर.
दिग्गज सूरबहार-सतार वादक व संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील ‘6-अ आकाश गंगा’ या लघुपटाचे स्क्रिनिंग व संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे शनिवारी करण्यात आले होते. लघुपटाची निर्मिती अन्नपूर्णा देवी फाउंडेशनने केली आहे. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे हा कार्यक्रम झाला. लघुपटाचे दिग्दर्शन निर्मल चंदर यांचे आहे.
लघुपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर पंडित नित्यानंद हल्दिपूर आणि निर्मल चंदर यांनी रसिकांशी प्रश्नोत्तररूपी संवाद साधला.
मैहर घराण्याचे उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांच्या कन्या रोशन आरा म्हणजेच अन्नपूर्णा देवी. शिष्यांमध्ये गुरू माँ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अन्नपूर्णा देवी यांचा जीवनप्रवास ‘6-अ आकाश गंगा’ या लघुपटातून उलगडला.
पंडित रविशंकर यांच्याशी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी झालेला विवाह, त्यांच्यासह गाजविलेल्या वादन मैफली, नावलौकिक मिळू लागल्यानंतर वैवाहिक जीवनात निर्माण झालेला दुरावा, त्यातून सार्वजनिक मैफल न करण्याचा त्यांचा दृढनिश्चय आणि त्यामुळे आलेला एकटेपणा या कारणांनी अन्नपूर्णा देवी अनेक दशके बंद दाराआड राहिल्या.
सूरबहार वादनात सिद्धी प्राप्त असूनही त्यांनी निग्रहाने मैफली करण्याचे टाळले. परंतु गुरू म्हणून अनेक शिष्यांना घडविले आणि मैहर घराण्याची सांगीतिक परंपरा पुढे सुरू ठेवली.
‘6-अ आकाश गंगा’ या लघुपटात पंडित नित्यानंद हल्दीपूर सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरीप्रसाद चौरासिया, तबला वादक डॉ. अनिश प्रधान, विदुषी शकुंतला नरसिंहन, पंडित रविशंकर यांचे चरित्रकार ऑलिव्हर क्रॅस्के, संगीतकार विनय भरत राम आदींनी अन्नपूर्णा देवी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पंडित नित्यानंद हल्दिपूर म्हणाले, ईर्षा नको, दुसऱ्याला नाही तर स्वत:ला खुष करण्यासाठी संगीत करावे, सूरांमध्ये स्वत:ला विसरून जाऊन आनंदाची अनुभूती घ्यावी ही गुरू माँची शिकवण अमलात आणून आजही वाटचाल सुरू ठेवली आहे.
दिग्दर्शक निर्मल चंदर म्हणाले, या लघुपटाची निर्मिती करण्यात जवळापास पाच वर्षांचा कालावधी लागला. माँ अन्नपूर्णा देवी यांच्या सारख्या मनस्वी कलावंताच्या जीवनावर आधारित लघुपट करताना त्यांच्या विषयीची अल्प माहिती तसेच मोजकेच ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असतानाही या लघुपटाची यशस्वीपणे आणि अत्यंत संयमाने निर्मिती करू शकलो याचे मानसिक समाधान आहे. या लघुपटाच्या कामासाठी पंडित हल्दीपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी आवजूर्न सांगितले.
ऋत्विक फाउंडेशनचे संस्थापक प्रविण कडले म्हणाले, ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे या लघुपटाचे स्क्रिनिंग व्हावे अशी अनेक दिवसांची इच्छा होती. अखेर ती पूर्णत्वास गेली.पंडित नित्यानंत हल्दिपूर आणि निर्मल चंदर यांचा सत्कार प्रविण कडले आणि चेतना कडले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता धारप यांनी केले.
जाहिरात