Marathi FM Radio
Wednesday, January 22, 2025

सरहद, पुणेतर्फे ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन!!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

जाती-धर्मावर विखुरलेला माणूस साहित्य संमेलनामुळे जोडला जाईल : सुशीलकुमार शिंदे !!

सरहद, पुणेतर्फे ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन !!

पुणे : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून 1954 साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्रासह देशात जाती-धर्मावर माणूस विखुरला गेला आहे, अशा परिस्थितीत दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल अशी आशा वाटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

Advertisement

दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) सुनीताराजे पवार, श्रीराम पवार, अनंत गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे, प्रा. मिलिंद जोशी, संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया.

Advertisement

सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 17) सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, डॉ. शैलेश पगारिया मंचावर होते.

Advertisement

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या साहित्यकृतीतून आजच्या लेखकांना नवीन विचारधारा दिली जाईल तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, समाज सुधारावा, समाजाला चांगले देता यावे, या विचाराने संजय नहार सतत कार्यरत असतात. चिंतनातून त्यांचे समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे. साहित्य परिषदेद्वारे नहार यांच्या कार्याला साथ देत असल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचेही त्यांनी कौतुक केले. श्रीराम पवार हे इतिहास, साहित्य, चिंतन आहेत आणि या चिंतनातून त्यांनी नवी भूमिका मांडली आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement


अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अग्रस्थानी आहेत. जे लिहितात ते बोलत नाहीत आणि जे बोलतात ते लिहीत नाहीत. दोघे मिळून काहीही करत नाहीत असा प्रवाद महाराष्ट्रात आहे, त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अपवाद होते. ताठ कण्याची मराठी माणसे दिल्लीत गेली की वाकतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी आपला बाणा सोडायचा नाही हा महाराष्ट्र धर्म तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि काकासाहेब गाडगीळ या दोघांच्याही विचारात दिसतो.

Advertisement

सांस्कृतिक सहिष्णुतेची पंडित नेहरूंनी अधोरेखित केलेली गरज वर्तमानात खूप महत्त्वाची आहे. शांती हेच धर्माचे उद्दिष्ट आहे. युद्धाची सुरुवात प्रथम मनात होते नंतर शस्त्रे हातात येतात. नव्या युगात विश्वमैत्रीची भावना रुजली नाही तर मानव समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल‌’ या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचाराची आजच्या समाजाला गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात असा विश्वास दृढ करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अध्यक्षीय भाषण आहे.

पुस्तकाविषयी भूमिका मांडताना श्रीराम पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले 1954 सालचे संमेलन मराठी भाषकांचे एकच राज्य व्हावे ही भूमिका घेऊन उभे राहिले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि काकासाहेब गाडगीळ यांच्या भाषणांमधून दिल्लीत मराठी माणसांचे अस्तित्व टिकावे, महाराष्ट्राची वकिली करणारे लोक दिल्लीत असावेत, या हेतूने दिल्लीत संमेलन घेतल्याचे लक्षात येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संवादाने पूल जोडण्याची भूमिका त्या संमेलनाद्वारे मांडली गेली.

संस्कृती, साहित्य, कला या विषयी उपस्थित श्रोत्यांना काही सांगावे एवढाचा त्या संमेलनाचा हेतू नव्हता तर मराठी संस्कृती, महाराष्ट्राविषयी माहितीचे दस्तऐवजीकरण या संमेलनातून करण्यात आले. महाराष्ट्राची सर्वसमावेशक भूमिका संपूर्ण देशात पसरविण्याचा हेतू या संमेलनातून साकार करण्याचा प्रयत्न झाल्याचे तर्कतीर्थ आणि गाडगीळ यांच्या भाषणातून जाणवते. भाषेनुसार भेद करू नका, सामाजिक ऐक्य टिकवा अशी भूमिका लेखकांनी घ्यावी असा आग्रह पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता असे जाणवते.

अनंत गाडगीळ म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक राजकारणी हे उत्तम साहित्यिक होते, साहित्यावर चर्चा, वैचारिक देवाण-घेवाण होत होती. परंतु आज वैचारिक वादाला शत्रुत्वाची धार आली आहे. साहित्यिकांनी त्यांच्या कृतीतून साहित्य जसे शास्त्र असते तसेच ते शस्त्रही बनू शकते हे दाखवून द्यावे.


प्रास्ताविकात संजय नहार यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी भूमिका विशद करून मराठी भाषेचा, मराठी माणसांच्या अस्मितेचा गौरव करणारे संमेलन आयोजित करायचे आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. शैलेश पगारिया यांनी मानले.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular