Marathi FM Radio
Sunday, December 22, 2024

ऋत्विक फाऊंडेशन, मॉडर्न कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कल्पकतेला वाव : केन झुकरमन !!

ऋत्विक फाऊंडेशन, मॉडर्न कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’!!

पुणे : संगीत क्षेत्र अमर्याद असून गायन हा संगीताचा आत्मा आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे हे संगीत केवळ नोटेशन पाहून सादर केले जात नाही तर एकाग्र चित्ताने ऐकून त्यात स्वत:च्या कल्पकतेची भर घालत आत्मसात केले जाते. हा विचार माझ्यातील कलाकाराला भावला. गुरूंच्या सान्निध्यात राहून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात मी रममाण झालो, अशा भावना स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांनी व्यक्त केल्या.

Advertisement


वाद्यसंगीत शिकताना स्वत:ला एकाच वाद्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. मुख्यत: गायन शिका, कारण कुठलेही वाद्य वाजविताना तुम्ही खरे तर मनातून गात असता. संगीत शिकणे व शिकविणे यासाठी वयाचे बंधन नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संगीत शिकता आणि शिकविताही येऊ शकते. मला वारशातून मिळालेले भारतीय शास्त्रीय संगीत मी शिकवत राहणार आहे, असेही त्यांनी आवजूर्न सांगितले.

Advertisement

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉर्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांना केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांच्या सांगीतिक क्षेत्राविषयीचे अनुभव ऐकावयास मिळाले. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील प्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी संवाद साधला.

Advertisement

केन झुकरमन आणि अनुपम जोशी (संवादक

Advertisement

भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया गायन शिकल्याने पक्का होतो, असे आपल्या गुरूंचे मत होते असे सांगून झुकरमन म्हणाले, एकाग्र चित्ताने गुरूंकडून ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे, कारण शिष्याने नेहमी एकाग्रचित्त राहून उत्तम श्रोता होणे आवश्यक असते. परंतु आजच्या काळात ही एकाग्रचित्त वृत्ती स्मार्ट फोनच्या अतिवापराने कमी होत चालली आहे. शिष्य कोण आहे, कुठला आहे याला महत्त्व नसून सुजाण पालक व उत्तम गुरू लाभल्यास पुढच्या पिढीतील गायक-वादक निर्माण करणे शक्य आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

मला लहानपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. लहानपणी मी गिटारवादन शिकलो. त्यातही गुरूंनी सांगितलेले साचेबद्ध वादन न करता नाविन्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होतो. अशातच भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे वादन ऐकले. त्यातून प्रभावित होऊन मी सुरुवातीस सतार वादनाकडे वळलो. परंतु सरोद हे वाद्य मनाला अधिक भावल्याने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सरोद वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

केन झुकरमन आणि महेशराज साळुंके (तबलासाथ)

उस्ताद अली अकबर खान यांच्यातील सांगीतिक दृष्टीकोन आणि कौशल्य मला आवडल्याने मी नेटाने सरोद वादन शिकण्यास सुरुवात केली. नवनिर्मितीच्या ध्यासातून मी सतत सरोद वादनात काही ना काही प्रयोग करीत राहिलो. त्यातूनच पहिल्या वादन मैफलीत जनसंमोहिनी रागाबरोरबच माझी स्वत:ची रचना वाजविण्याचे धाडस केले. गुरूंनी मला योग्य दिशा दाखवत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहितच केले, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा जाणून घेताना राग विस्ताराचे स्वातंत्र्य असल्याचे जाणवल्याने भारतीय अभिजात संगीताला मी वाहून घेतले आहे.

मैहर घराण्याच्या सरोद वादनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यातील बारकावे सांगताना केन झुकरमन यांनी झमझमा, सिधा झाला, उलटा झाला आदी प्रकार वादनातून ऐकविले. तंत्राची नक्कल करता येते परंतु वादनातील अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी कलाकारामध्ये कल्पकता असण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

वादन मैफलती केन झुकरमन यांनी गुरू उस्ताद अली अकबर खान यांचा आवडता बागेश्री कानडा हा पारंपरिक राग अतिशय प्रभावीपणे सादर केला. गुरूंची निर्मिती असलेल्या चंद्रनंदन या सुरेल, सुमधूर रागाच्या निर्मितीमागील कथा उलगडत त्यांनी हा राग ऐकवून रसिकांना अचंबित केले. त्यांना पुण्यातील युवा तबला वादक महेशराज साळुंके यांनी समर्पक साथ केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संस्थापक प्रविण कडले, चेतना कडले आणि मॉडर्न महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे विभाग प्रमुख पुष्कर लेले यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी वाठारे यांनी केले तर आभार श्रुती पोरवाल यांनी मानले.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org