गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागात पाणीसुविधा देणाऱ्या
सतीश खाडे यांचा शुक्रवारी रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गौरव !!
पुणे : पाणी बचतीचा संदेश देण्याबरोबच ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या सतीश खाडे यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेल्या 12 वर्षांपासून सतीश खाडे रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पाण्यासंदर्भात त्यांनी 550 पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
सतीश खाडे
विहिरीतील गाळ काढून जलस्रोत जीवंत ठेवले आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये तसेच गावांमध्ये पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. खाडे यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे शुक्रवार, दि. 10 मे रोजी त्यांचा ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पाणी’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात वर्षा कुलकर्णी, वासंती वैद्य, निरुपमा महाजन, स्वप्नील पोरे, श्रीनिवास शारंगपाणी, बंडा जोशी, तनुजा चव्हाण, सरोज बामणे, सीताराम नरके, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, मिलिंद शेंडे, स्वाती दाढे, माया मुळे, आश्लेषा महाजन यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात