गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मा. नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ कार्यक्रम शनिवारी !!
गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून होणार सादरीकरण !!
संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणेचा संयुक्त उपक्रम
पुण्यात शुभारंभ : राज्यासह दिल्लीतही होणार कार्यक्रम !!
पुणे : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर होणारा हा कार्यक्रम शनिवार, दि. 14 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे निलेश कोंढाळकर आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘मन का गीत’ हा विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. ‘मन का गीत’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची असून संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे तर दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते योगश सोमण यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजनाची बाजू सांभाळली आहे.
पुस्तकातील निवडक कविता व गीतांचे अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे करणार आहेत. शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर विविध रचनांवर नृत्यविष्कार सादर करणार आहेत. निकिता मोघे यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार असून संयोजन केतकी महाजन-बोरकर करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‘नयन हे धन्य हे’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती निलेश कोंढाळकर आणि सुनील महाजन यांनी दिली.
राजकीय व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वांना ओळख आहे. मात्र कवी, साहित्यिक म्हणून पंतप्रधान मोदी हे ‘मन का गीत’ या कार्यक्रमाद्वारे प्रथमच समोर येणार आहे. शनिवारी होणारा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग असून राज्यात विविध ठिकाणी तसेच दिल्लीतही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक