विवाह एक भीषण परिस्थिती – तडजोड आवश्यक आहे ! – विवाहप्रसाद विवाहसंस्था
हल्लीच्या काळात लग्न करू इच्छिणाऱ्या मुलामुलींचा तडजोड न करण्याचा जो आग्रह आहे त्यामुळे विवाह ही एक भीषण समस्या निर्माण झाली आहे.
विवाहप्रसाद संस्थेच्या सर्वेक्षणानुसार तडजोड करणार नाही ह्या पालक व मुलांच्या अट्टाहासापायी पुढील काळात लग्न न झालेले वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील अशी गंभीर परिस्थिती समाजामध्ये निर्माण होतांना दिसत आहे.
तारुण्य संपल्यावर व वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभे राहून लग्न केल्यावर कशा प्रकारच्या वैवाहिक जीवनाची प्राप्ती होणार आहे याची जाणीव व समज ह्या तरुणांना करून देण्याची वेळ आलेली आहे.
अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देतांना दिसत आहे.
खरेतर मुलामुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे संसाराची सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन करू शकतात. परंतु वेळेत विवाह न झाल्याने पालकांची पिढी आणि आताची विवाह न झालेली दुसरी पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकांना स्वतःच्या वैवाहिक आयुष्याची देखील एवढी चिंता नव्हती जेवढी त्यांना आता त्यांच्या मुलांचे विवाह ठरवण्याची चिंता वाटत आहे.
लग्न जुळवतांना अनुरूप असणे म्हणजे फक्त दिसणे , पॅकेज , प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या किंवा डिग्रीचा विचार करणे असे नाही हे समजावण्याची वेळ आलेली आहे.
कौटुंबिक आयुष्यात बरी वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधारच जास्त प्रमाणात असतात व ते असणे म्हणजेच अनुरूप असणे होय.
विवाहप्रसाद संस्थेच्या सर्वेक्षणानुसार असा निष्कर्ष समोर आला आहे की मुलामुलींकडून असलेल्या भ्रामक अपेक्षा जसे की उच्च शैक्षणिक पात्रता , आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे मोठे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रातच म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे अशा हट्टापायी तरुणांचे विवाहाचे वय निघून जात आहे व ते नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत.
अजून लग्न होत नाही ह्या नैराश्यामुळे तरुणांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होऊन कुंटुबिक व सामाजिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ली एकवेळ नोकरी मिळणे सोपे झाले आहे परंतु कितीही चांगले शिक्षण झाले व मोठा पगार असला तरी आयुष्याचा जोडीदार मिळणे अवघड झाले आहे.
योग्य वयात लग्न झाल्यावर मिळणाऱ्या वैवाहिक सौख्याच्या आनंदाला ही पिढी पारखी होत चालली आहे आणि तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.
खरं तर समोरच्याचा बायोडाटा अभ्यासून तो आवडला असल्यास त्यातील अडचणीच्या मुद्द्यांवर थोडीफार तडजोड करून कशा प्रकारे विवाह पक्का करता येईल हा विचार गंभीरपणे करणे गरजेचे आहे. अन्यथा ठराविक बाबींचा अतिआग्रह हा वैवाहिक आयुष्याला मारक ठरून कितीही कल्पनांचे इमले रचले तरी प्रत्यक्ष आयुष्यात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे.
आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपली केवढी मोठी चूक होत आहे व त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत शिवाय सामाजिक संतुलन देखील बिघडून आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्या बाबी कशा प्रकारे मारक ठरत आहेत हा विचार होणे गरजेचे आहे.
खरे तर स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते. परंतु अतिप्रमाणात केलेल्या अपेक्षांमुळे आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचाच उखडून टाकत आहोत.
आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न आता सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर गंभीर होताना दिसत आहे.
तरुणांनी व पालकांनी हा विचार करायला हवा की शेवटी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे परंतु त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे.
शिवाय एवढे करून आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वाया गेलेला वेळ , गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले प्रयत्न काय कामाचे आणि वाढलेल्या वयाचे पुढे काय व कसे होणार ह्याचा देखील विचार होणे गरजेचे आहे.
उशीरा लग्न झाल्यावर आपल्या पुढच्या पिढीवर व स्वतःच्या पुढील आयुष्यावर ह्याचा कोणता व कसा परिणाम होईल ह्याचा थोडा विचार केल्यावर कळेल की वेळेवर लग्न होणे अत्यंत आवश्यक आहे व ते अति अपेक्षा न बाळगता थोडी तडजोड करून सहज शक्य देखील आहे. असे केल्याने आपण आपल्या वैवाहिक आयुष्याची स्थिरता नक्कीच प्राप्त करू शकू.
प्रसाद शिवरकर संचालक – विवाहप्रसाद विवाहसंस्था