गोल्डन आय न्यूज नेटवर्क
धर्मांधता दूर होण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस !
विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी : डॉ. श्रीपाल सबनीस !
भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान रत्न पुरस्काराने डॉ. श्रीपाल सबनीस, ॲड. शैलजा मोळक यांचा गौरव !!
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचा उपक्रम !
पुणे : राजकीय क्षेत्रात लोकशाहीचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानाला अपेक्षित भारत घडविणे हे राज्यकर्त्यांचे आणि जनमानसांचे आद्य कर्तव्य आहे. आज समाजात धर्मांधता वाढली आहे. या धर्मांधता, संघर्षापासून दूर राहण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते.
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी आयोजित संविधान रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. श्रीपाल सबनीस, ॲड. शैलजा मोळक, मधुकर भावे, लता राजगुरू, सचिन ईटकर.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, परशुराम वाडेकर, प्रा. रतनलाल सोनग्रा मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. सबनीस म्हणाले, भारतीय संविधान म्हणजे सर्व संतांच्या संतत्त्वाची, महापुरुषांच्या चांगुलपणाची, सत्य-शहाणपण-विवेक आणि धर्मनिपरक्षेतेची बेरीज आहे. दु:खमुक्त मानवता हा समाजातील प्रत्येकाचा ध्येयवाद असला पाहिजे. आज विश्वात अशांती, उपासमार, अन्याय, शोषण आहे अशा सामाजिक परिस्थितीत भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशा-देशाला, माणसा-माणसाला जोडणे हे कार्य निश्चितच घडू शकते. संविधानाच्या संस्कृतीचा अंगिकार केल्यास संपूर्ण विश्वाला कवेत घेता येणे शक्य आहे. विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी आहे.
मधुकर भावे म्हणाले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा पाया धरून रचलेले संविधान स्वीकारल्याशिवाय देश चालविता येणार नाही. संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांना समान न्याय मिळू शकतो, परंतु आजच्या सामाजिक परिस्थितीत संविधानाचा अनादर करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. घटनेवर आधारित राजकारण आज होते आहे का या विषयी राज्यकर्त्यांनी विचार करणे आवश्यक आहे.
ॲड. शैलजा मोळक यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत संविधानाविषयी अभ्यास, वाचन तसेच त्यानुसार आचरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संविधानाच्या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा, जातपात-धर्मविरहित समाज एकत्र यावा यासाठी आपण अखंडित कार्यरत राहणार आहोत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन ईटकर यांनी संविधानाची उपयुक्तता सांगितली तर स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. परशुराम वाडेकर यांनी पुरस्कारप्राप्त डॉ. सबनीस आणि ॲड. मोळक यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.