गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 23व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाची सांगता.!!
हेमा उपासनी, पं. संजय गरुड यांचे बहारदार गायन : सहाना बॅनर्जी यांच्या सतारीचे निनादले झंकार !
ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने पं. सीतारामबापू सरोदे यांचा गौरव !!
पुणे : प्रसिद्ध सतारवादक सहाना बॅनर्जी यांच्या सतारीचे सुमधूर झंकार, गायिका हेमा उपासनी यांचे प्रभावी गायन आणि पं. संजय गरुड यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने 23व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाची रविवारी सांगता झाली. महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी ‘पुरिया कल्याण’, ‘यमन’ आणि ‘सूरमल्हार’ अशा विविध रागांनी सजलेल्या मैफिलींचा रसिकांनी आनंद घेतला.
ब्रह्मनाद पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) विभास आंबेकर, विजयमहाराज जगताप, पं. सीतारामबापू सरोदे, उल्हास पवार, सुभाष चाफळकर, पं. संजय गरुड.
पंडित संजय गरुड यांच्या ब्रह्मनाद कला मंडळातर्फे दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी कोलकाता येथील प्रसिद्ध कलाकार सहाना बॅनर्जी यांनी सतारवादनाची सुरुवात राग पुरिया कल्याणने केली. आलाप, जोड, झाला अशा क्रमाने त्यांनी रागविस्तार केला. एक धून सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. महेश साळुंखे यांनी तबल्यावर रंगतदार साथसंगत केली. गुरुपत्नी शीला देशपांडे यांच्या हस्ते सहाना बॅनर्जी यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ गायक, गुरू आणि संगीत समीक्षक पं. नाथ नेरळकर यांच्या कन्या आणि शिष्या हेमा उपासनी यांनी राग यमनमधील पं. नेरळकर रचित ‘करुणाकरा आनंदरूपा’ या मध्यलय तीनतालातील रचनेनंतर आडाचौतालमध्ये बांधलेली ‘सुघर चतुर बैया पकरत’ ही रचना सादर केली. संत सोयराबाई यांचा ‘अवघा रंग एक झाला’ हा सुप्रसिद्ध अभंग सादर करून त्यांनी गायनात रंग भरले. या अभंगाचे संगीत पं. नेरळकर यांचेच होते. त्यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव हिमांशु कुलकर्णी यांची ‘रात्र ऐसी गोठली की चंद्रही थरकापला’ ही गजल त्यांनी पेश केली. त्यांना तुषार केळकर (संवादिनी), रोहन पंढरपूरकर (तबला), माऊली फाटक (पखवाज) तसेच प्राजक्ता जोशी, संस्कृती काडावी आणि नेहा कुलकर्णी यांनी तानपुरा व गायनसाथ केली.
ब्रह्मनाद संगीत महोत्सवात गायन करताना पं. संजय गरुड
ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्कार 2024 भजनसम्राट गुरुवर्य पं. सीतारामबापू सरोदे यांना ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम, असे पुरस्काराचे स्वरूप होते. मी अनेक वर्षे केलेल्या संगीत कलेच्या सेवेचे फळ म्हणजे हा पुरस्कार आहे, असे मनोगत पं. सीतारामबापू सरोदे यांनी व्यक्त केले.
पं. सीतारामबापू यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत संगीत तपश्चर्या केली आहे. आपल्या भजनगायनातून अनेकांना भक्तीचा सुगम मार्ग दाखवला आहे’, अशा शब्दांत उल्हास पवार यांनी पं. सरोदे यांचा गौरव केला.
ब्रह्मनाद संगीत महोत्सवात सतारवादन करताना सहाना बॅनर्जी
ब्रह्मनाद संगीत महोत्सवाची सांगता महोत्सवाचे आयोजक आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजय गरुड यांच्या दमदार गायनाने झाली. त्यांनी राग सूरमल्हारमध्ये विलंबित एकतालातील ‘गरजत आये’ हा ख्याल मांडला. त्याला जोडून गायलेल्या ‘बादरवा बरसन लागी’ या द्रुत तालातील बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर किरवाणी रागामधील ‘सजनवा तुम क्या जानो प्रीत’ ही ठुमरी सादर केली. मैफलीची सांगता ‘जो भजे हरी को सदा’ या सुप्रसिद्ध भक्तीरचनेने केली. त्यांना भरत कामत (तबला), तुषार केळकर (संवादिनी), ऋग्वेद जगताप (पखवाज), प्रसाद कुलकर्णी, ओंकार खरात, दिनेश माझिरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
ब्रह्मनाद संगीत महोत्सवात गायन करताना हेमा उपासनी
याप्रसंगी विजयमहाराज जगताप, विकास पनवेलकर, सुभाष चाफळकर, विभास आंबेकर, रवींद्र हेजीब या मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.
जाहिरात