गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कोथरूड गणेश फेस्टिवलमध्ये ‘तू म्हणशील तसं’
संवाद, पुणे आणि प्रबोधन विचारधारातर्फे दि. 14 व दि. 16ला आयोजन !!
‘सत्य शिवाहून सुंदर हे!’ बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेवर रंगणार सुंदर अविष्कार !
रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत कविसंमेलनाचे आयोजन !!
पुणे : संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 14 व सोमवार, दि. 16 रोजी कोथरूड गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तू म्हणशील तसं’ या बहुचर्चीत नाटकाचा प्रयोग, मराठी कविसंमेलन आणि गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेच्या विविध पैलूंवरील सुंदर गीतांचा अविष्कार ‘सत्य शिवाहून सुंदर हे!’ अशा अनोख्या कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
फेस्टिवल कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. कोथरूड गणेश फेस्टिवलचे उद्घाटन शनिवार, दि. 14 रोजी दुपारी 12 वाजता सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे, लोकमान्य मल्टिपर्पज, को-ऑप सोसायटीच्या पुणे शाखेचे संचालक सुशील जाधव, बुलढाणा अर्बन को. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देशपांडे, बढेकर ग्रुपचे चेअरमन प्रविण बढेकर, रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे चेअरमन एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती फेस्टिवलचे निमंत्रक, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाचे संयोजन केतकी महाजन-बोरकर करीत आहेत.
उद्घाटन समारंभानंतर गौरी थिएटर निर्मित, पुणे टॉकिज प्रस्तुत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आयोजित ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यात संकर्षण कऱ्हाडे, काजल काटे, अमोल कुलकर्णी, प्रिया करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे असून निर्मिती गौरी प्रशांत दामले यांची आहे.
सायंकाळी 5 वाजता ‘सत्य शिवाहून सुंदर हे!’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात सचिन घनपाठी, गौरी कुंटे आणि पल्लवी आनिखिंडी या गायक कलाकारांचा सहभाग आहे. अद्वैत कुलकर्णी, मंदार गोडसे, अक्षय पाटणकर, हेमंत पोटफोडे साथसंगत करणार आहेत. प्राजक्ता वैद्य यांचे निवेदन आहे.
सोमवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता मराठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रकाश होळकर (लासलगाव), आबिद शेख (पुसद), आबा पाटील (मंगसुळी), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), लता ऐवळे (सांगली), भाग्यश्री केसकर (धाराशिव), गुंजन पाटील (संभाजीनगर), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पुणे), विजय पोहनेरहर (संभाजीनगर), शशिकांत तिरोडकर (पुणे), बालिका बिटले (सातारा) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वात्रटिकाकार, प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.
रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे चेअरमन एम. एल. चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे ब्रँच मॅनेजर सुहास नाडगौडा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज, को-ऑप सोसायटी, बढेकर ग्रुप आणि रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटी यांचे कोथरूड गणेश फेस्टिवलला सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
__________________________________________
जाहिरात