गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी : वजाहत हबीबुल्लाह !
जनतेला बरोबर घेऊन केलेले शासन हेच सुशासन : वजाहत हबीबुल्लाह !
लोकतंत्र यशस्वी होणे जनतेच्याच हाती : वजाहत हबीबुल्लाह !
जनसेवकाची भूमिका पारदर्शक असावी : वजाहत हबीबुल्लाह !
सरहद, पुणेतर्फे देशाचे माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान !!
पुणे : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये आपण जनतेची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना जनसेवकाची असली पाहिजे. सुशासनाबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असून शकतो, परंतु जनतेला सोबत घेऊन केलेले शासन हे खरे सुशासन होय. सरकारची प्रत्येक कृती जनतेला माहिती असणे आवश्यक आहे.
लोकतंत्रात अनेक कमतरता असतात कारण लोकतंत्र कधीही परिपूर्ण असू शकत नाही. लोकतंत्र यशस्वी होणे पूर्णपणे जनतेच्या हातात असते, असे प्रतिपादन भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी केले. माहिती अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शक सरकार निर्माण करून योग्य ते कायदे लागू करून सुशासन निर्माण करण्यात सफलता मिळविण्यासाठी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणे आवश्यक आहे.
वजाहत हबीबुल्लाह, डॉ. नितीन करीत यांच्या सवमवेत डॉ. माधव गोडबोले स्मृती सन्मानप्राप्त प्रकाश पोळ, सुहास मापारी, प्रतिभा भराडे, विजय कुंभार.
जनसेवकाने पारदर्शक राहून जनता सुरक्षित करण्यात हातभार लावला तर लोकतंत्र नक्कीच यशस्वी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सरहद, पुणेतर्फे भारताचे माजी गृह सचिव स्व. डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ आज (दि. ११ ऑगस्ट) ‘सुशासन : कल्पना की वास्तव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वजाहत हबीबुल्लाह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव,राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. व्याख्यानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. व्याख्यान टिळक स्मारक मंदिर येथे झाले.
याच कार्यक्रमात डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवृत्त विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
.. तर पंडितांचे स्थलांतर टळले असते
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी झाली, जनता मारली गेली असे सांगून वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांध्ये धर्मावरून कायम तेढ निर्माण व्हावी हाच पाकिस्तानचा हेतू राहिला आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजे पहेलगामधील धर्मविचारून केलेली हिंदूंची हत्या होय. १९६८ ते १९८२ या काळात काश्मीरमध्ये कार्यरत असताना तेथील सामाजिक वातावरण पूर्णत: अहिंसा आणि प्रेमाचेच होते. पाकिस्तानने धार्मिक तेढ निर्माण केल्यानंतर प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात घेवून हिंदूंची सुरक्षितता सांभाळली असती तर पंडितांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले नसते.
काश्मीरी आम जनतेला विश्वासात घेऊन सुशासन निर्माण करणे ही त्या काळातील सरकारची जबाबदारी होती.माहिती अधिकाराविषयी बोलताना वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, या विभागात काम करू लागल्यानंतर जनतेला नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कायद्यांविषयक तसेच सरकारच्या प्रत्येक कृतीविषयक माहिती नव्हती, हे लक्षात आले. सरकारी कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या विभागीय कामकाजाबद्दलही माहित नव्हते.
सरकारमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे, दु:शासन होत आहे हे जनतेला ठाऊक नव्हते. जनसंपर्क ठेवायची इच्छा असली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सामान्य जनतेला पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. सचिवालयातही मोठ्या प्रमाणात ‘बिझनेस हाऊसेस’मार्फत भ्रष्टाचार होत आहे याची कल्पना मला देखील नव्हती. लोकतंत्र जनतेच्याच हातात आहे असे सांगताना ट्रम्पसारखा एक जोकर जनतेनेच निवडून दिला आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.
समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे आवश्यक : डॉ. नितीन करीरडॉ. नितीन करीर म्हणाले, माहिती अधिकार हा साध्य नाही तर तो सुशासनाकडे जाण्याचा मार्ग आहे. नैतिकता, कार्यक्षमता, परिणामकता आणि पारदर्शकता म्हणजे सुशासन होय. प्रत्येक प्रशासकीय निर्णयाला नैतिकता व विवेकाचा पाया असणे आवश्यक आहे.
कायदा निर्माण केल्यानंतर त्याची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी या करिता प्रशासनाने तत्पर राहणे आवश्यक आहे. कायदे करताना जनतेचा विचार लक्षात घेऊन, चर्चा करून त्याची पारदर्शकतेने अंमलबजावणी होत आहे की नाही याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांच्या लोकांनी काहीही न करणे यातूनच वाईटाचे साम्राज्य उभे राहते म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे, एकत्र येणे आणि सरकारला योग्य-अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. हे साधल्यास सुशासन हे स्वप्न न राहता सत्य होईल.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि ना. गोपाळकृष्ण गोखले, शहीद भगतसिंग आणि डॉ. माधव गोडबोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविकात संजय नहार यांनी वजाहत हबीबुल्लाह यांचा परियच करून देत कार्यक्रमाविषयी माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची तर स्वातंत्र्यानंतर ना. गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांची गरज आहे.
युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी ‘बीड वाचतंय’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. वजाहत हबीबुल्लाह यांचे स्वागत डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि शाल देऊन करण्यात आले. तर डॉ. शैलेश पगारिया व शैलेश वाडेकर यांनी ग्रंथ व स्मृतीचिन्ह भेट दिले. डॉ. नितीन करीर यांचा सन्मान लेशपाल जवळगे, अनुज नहार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.