गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल. पंडित विद्यासागर :
बहुरंग आयोजित 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : आदिवासी समाजासंदर्भातील संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी समाज, त्यांची संस्कृती टिकण्यासाठी मदत होईल, असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. विद्यापीठांमधील भाषा विभाग, ललित कला केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बहुरंग, पुणेतर्फे दोन दिवसीय 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 19) पंडित विद्यासागर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, आदिवासी संस्कृती अभ्यासक ग. श. पंडित मंचावर होते.
बहुरंग, पुणे आयोजित 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. कुंडलिक केदारी, पंडित विद्यासागर. ग. श. पंडित.
माडीया गोंड लोक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेले ‘शीरमोर’ हे यंदाच्या महोत्सवाचे बोधचिन्ह आहे. राज्य शासनाअंतर्गत असलेला सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंडित विद्यासागर म्हणाले, विस्थापन, मुलभूत सुविधा, आर्थिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण हे आदिवासी समाजासमोरील मुख्य प्रश्न आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याविषयी दोन प्रवाह आहेत.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्यास त्यांची संस्कृती कशी टिकणार, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात न आणल्यास त्यांचा विकास कसा साधणार असे प्रश्न उपस्थित केले जातात. आदिवासी प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात.
आदिवासी समाजाची ओळख पुसण्याचाच प्रयत्न..
प्रास्ताविकात डॉ. कुंडलिक केदारी म्हणाले, देश-विदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, बोलीभाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रूढी-परंपरा तसेच कला, संगीत, नृत्य, नाट्य या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते.
शासनस्तरावर आदिवासी विभाग आहेत पण आदिवासी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी या विभागाकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. मात्र आदिवासींची ओळख पुसण्याचाच प्रयत्न या विभागाद्वारे होत असल्याबद्दल डॉ. केदारी यांनी खंत व्यक्त केली.
उद्घाटन समारंभानंतर विविध लघुपट दाखविण्यात आले. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपट निर्मात्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ग. श. पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले तर आभार धीरज केदारी यांनी मानले.