गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गझल लिहिणे ही एक जोखीमच असते : प्रा. मिलिंद जोशी
ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई आयोजित मराठी गझल मुशायरा रंगला !
पुणे : केवळ काफीया आणि रदीफ साधून उत्तम गझलरचना होत नाही. वृत्तरचनेइतकाच गझलेमध्ये लघु गुरु अक्षरांचा क्रम कसोशीने सांभाळाचा लागतो आणि मात्रांचा हिशेब तर गणिती पद्धतीने चोख राहील याची काळजी घ्यावी लागते. ही सारी आचारसंहिता पाळली तरच निर्दोषपणा आणि सफाई फार चांगल्या पद्धतीने प्रत्ययाला येते. गझल लिहिणे ही एक जोखीमच असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई आयोजित मराठी ग़झल मुशायरा या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. आनंद पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी गझल मुशायरा सादर करण्यात आला.
त्यात विश्वास कुलकर्णी, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, महेश देशपांडे, निर्मिती कोलते, संदीप मर्ढेकर, विशाल राजगुरु, एजाज शेख यांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकारांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात योग्य ते स्थान मिळावे, अशी अपेक्षा गझलकारांनी व्यक्त केली. त्यावर सकारात्मक विचार करू असे प्रा. जोशी यांनी सांगितले.
प्रा. जोशी म्हणाले, गझल म्हणजे केवळ प्रेमगीत नसते.
त्यातून सामाजिक आशयही प्रभावीपणे प्रकट करतायेतो. लेखनातीलच नव्हे, वाचनातीलही बेहोषी, बुद्धिचातुर्य, अनुभवांच्या विरोधपूर्ण मांडणीतून साधली जाणारी कल्पना चमत्कृती, ठाम आणि निर्णायक विधानांमुळे आविष्कारात येणारा ठोसपणा या विशेषांमुळे गझलला दादही भरपूर आणि तत्काळ मिळते. एखाद्या नाजूक, तरल, संयत आणि सूचक कवितेपेक्षा आवाहक आणि आक्रमक गझल श्रोत्याला अधिक मानवते.
श्रोत्यांकडून चटकन् दाद वसूल करणारा आणि लोकप्रियेतेचे भरगच्च माप कवीच्या पदरात टाकणारा हा रचना प्रकार आकर्षक आणि अनुकरणीय वाटला, तरी गझलरचना वाटते तितकी सोपी नसते. सच्चा अनुभव त्याच्या लयीसह गझलेत उत्स्फूर्तपणे मांडत शेर कसा बोटीबंद होईल याचे कसब साधावे लागते. सूत्रसंचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.