गोल्डन आय न्यूज नेटवर्क
25 ते 28 जानेवारीपासून एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन – 2024 चे आयोजन !!
पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द पुष्प प्रदर्शनाची पुण्यासहित देश-विदेशातील वाट पाहत असतात, अशा एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन – 2024 चे आयोजन 25 ते 28 जानेवारीपासून केले आहे.
पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्ष देखील जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील.
या वर्षीच पुष्प प्रदर्शन दि. 25 जाने. ते 28 जाने. 2024 या दरम्यान होत असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता, श्री. विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी रात्रौ 7. 30 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.26, 27 आणि 28 जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील. अशी माहिती सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन), अनुपमा बर्वे (मानद सहसचिव) यशवंत खैरे (मानद सचिव), निलेश आपटे (रोज सोसायटी) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे 1000 ते 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. 21 जाने. 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
अॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात.
ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सुरवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते.
मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरविले जाते त्यामध्ये अबाल- वृद्धांचा सहभाग असतो. सर्वसामान्यांचा पुष्पप्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढविण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे, इ. गोष्टींच्या स्पर्धा या निमिताने आयोजित करण्यात येतात.
तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.केवळ स्पर्धे पुरते मर्यादित न राहता.
पुष्प प्रर्दशनानिमित्ताने बागेस भेट देणार्या पुष्प रसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो. पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षक रीत्या सजविण्यात येते.
त्यामुळेच तर पुष्प रसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात.पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.
————————————————————-
जाहिरात