Marathi FM Radio
Sunday, April 20, 2025

डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने हभप जयवंत महाराज बोधले, डॉ. प्रकाश खांडगे यांचा गौरव !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

संत परंपरेचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कीर्तनकारांचे महान योगदान!!

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन !

डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने हभप जयवंत महाराज बोधले, डॉ. प्रकाश खांडगे यांचा गौरव !!

पुणे : महाराष्ट्राला जी थोर संत परंपरा लाभली आहे तशी देशातील कुठल्याही भागाला लाभलेली नाही. अमृताहुनी फिके वाटावे असे संतसाहित्य लाभणे हे महाराष्ट्राचे प्रगल्भ, समृद्ध संचित आहे. मराठी भाषा लिहिता-वाचता येणारी प्रत्येक व्यक्ती धन्य आहे. संत परंपरेचा खजिना लोकांपर्यंत पोहोचविण्यात कीर्तनकारांचे महान योगदान आहे. कीर्तनकारांनी हे ज्ञान सुशिक्षित तसेच अशिक्षित लोकांपर्यंतही पोहाचविले आणि संस्कृतीचे जतन केले,

Advertisement

Advertisement

असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे (अयोध्या) कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. जेथे समाजमानसाची मशागत होते, भक्तीची शिकवण दिली जाते, ज्यातून कृतज्ञता येते तो माणूस माणूस म्हणून ओळखावा तसे नसल्यास त्यातील माणुसपणे संपले आहे हे जाणावे. आज कीर्तनकारांच्या नावाखाली तमासगीर, विनोदाचार्य निर्माण होत आहेत, ही खेदाची बाब आहे. रुक्ष शिक्षण रावणनिर्मिती करीत आहेत; परंतु शिक्षणाबरोबर भक्तीचा संस्कार दिला गेल्यास त्याच्यात राम निर्माण होतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Advertisement

संत विचार प्रबोधिनी, पुणे आयोजित वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आज (दि. 13) टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांना तर वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला सेवा पुरस्कार लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisement

Advertisement

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, वासकर महाराज फडाचे प्रमुख ह. भ. प. राणा महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, बीव्हिजीचे हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, देहू संस्थानचे ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अंजली देखणे, डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ. पूजा देखणे, डॉ. पद्मश्री जोशी मंचावर होते.

वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) मकरंद टिल्लू, पुरुषोत्तम महाराज मोरे, हणमंतराव गायकवाड, ॲड. राजेंद्र उमाप, राणा महाराज वासकर, डॉ. प्रकाश खांडगे, चंद्रकांत पाटील, गोविंद देव गिरीजी महाराज, जयवंत महाराज बोधले, अरुणा ढेरे, डॉ. भावार्थ देखणे, अंजली देखणे, सचिन ईटकर, माणिक महाराज मोरे, डॉ. पद्मश्री जोशी, डॉ. पूजा देखणे.

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज डॉ. रामचंद्र देखणे यांच्या विषयी बोलताना म्हणाले, कीर्तनकार, प्रवचनकार प्रबोधनाचे कार्य करीत असतात. त्या परंपरेतील प्राचीन आणि अर्वाचिन यांचा सांधा साधत पुढील पिढीपर्यंत संत विचार पोहोचविण्याचे कार्य देखणे महाराज यांनी केले आहे. आपला धर्म, वारकरी संप्रदाय निर्दोष आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मातृभाषेत शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण तसेच संस्कार आणि परंपरा देणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कीर्तनात समाजप्रबोधनाची ताकद असल्यामुळे याचाही शिक्षणपद्धतीत समावेश करण्यात आला आहे. वारकरी परंपरा, कीर्तन परंपरा कधीही खंडित होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले म्हणाले, डॉ. रामचंद्र देखणे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला कार्य प्रेरणा देणारा ठरणार आहे. संत एकनाथ महाराज यांची सर्वसमावेशक भूमिका देखणे सरांनी अंगिकारली होती.

डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, लोक कलेच्या अभ्यासातून कीर्तन, वारकरी परंपरेतील मान्यवरांचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य सजमतो. देखणे सरांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी प्रसादासमान आहे.

प्रास्ताविकात डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, डॉ. रामचंद्र देखणे हे हाडाचे वारकरी, कीर्तनकार तसेच लोकसाहित्यिकही होते. यामुळेच कीर्तन आणि लोकसाहित्याच्या प्रांतात पुरस्काराचे वितरण केले जात आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचे सांस्कृतिकीकरण केले जाते.

गौरवपत्राचे वाचन डॉ. पूजा देखणे यांनी केले. सूत्रसंचालन नरहरी महाराज चौधरी यांनी केले तर आभार डॉ. पद्मश्री जोशी यांनी मानले.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular