गोल्डन आय न्यूज नेटवर्क
“भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा”!!
पारंपरिक वेशभूषेत जैन भाविकांचा सहभाग सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले भगवान महावीर यांचे दर्शन…!!
पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. 10) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
“त्रिशला नंदन वीर की …. जय बोलो महावीर की,,, जय बोलो महावीर की” असा जयघोष करीत मंगलवाद्यांच्या सुरात शोभायात्रेची सुरुवात झाली.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, प्रचार प्रमुख सतीश शहा, विलास शहा, हरेश शहा, महावीर कटारिया, अल्पेश गोगरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शोभायात्रेला सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत सुरुवात झाली. पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जैन बंधू-भगिनी उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शोभायात्रेत पुण्यातील विविध भागांमधून रथ सहभागी झाले होते त्याच प्रमाणे महिला मंडळांचाही सहभाग होता.
शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हल लव्हज् चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी 12:30 वाजता पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते.
शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. हा रथ भाविकांनी स्वत: ओढत नेला. भगवान महावीर यांच्या जन्माचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महिलांनी महावीर जयंतीचे महत्त्व सांगणारे तसेच सामाजिक संदेश देणारे विविध फलक हाती घेऊन जनजागृती केली. सप्त अश्वांचा चंदेरी रथ, गजरथ, सिंहरथ यांच्यासह विविध बँड सहभागी झाले होते.
सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले आचार्य विरागसागर सुरीश्वरजी महाराज आदि ठाणा यांचे दर्शन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, ना. चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप,अभय छाजेड, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले आदींनी घेतले.
समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर घेण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे वाटप, पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याकरीता मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव धायरी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. भवानी पेठेत नि:शुल्क आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
पोपटसेठ ओस्तवाल, राजेश शहा, सुनील कटारिया, नितीन जैन, निलेश शहा, भूपेंद्र शहा, भद्रेश बाफना, भरत सुराणा, संदीप भंडारी, अभय जैन या प्रसंगी उपस्थित होते.
अहिंसा रॅलीला प्रतिसाद
भव्य दुचाकी अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात दादावाडी अहिंसा भवन येथे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री भवन) येथे रॅलीची सांगता झाली.
ही विनंती.
अचल जैन,
अध्यक्ष, श्री जैन सामुदायिक उत्सव समिती