गोल्डन आय न्युज नेटवर्क
आंध्रातील नाट्यअभ्यासक, कलावंत ‘पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीतील प्रेक्षक.
पुणे : संगीत नाटकाच्या माध्यमातून मराठी आणि तेलगू रंगभूमीचे नाते तब्बल 120 वर्षांपूर्वी जोडले गेले आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील असलेले पण नोकरीनिमित्त 1982 पासून पुण्यात वास्तव्यास असलेले ए. एल. मूर्ती आंध्रप्रदेशातीलच. ते मराठी नाटकांबरोबरच पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेलाही नियमित हजेरी लावतात.
‘पुरुषोत्तम’ स्पर्धेचा नावलौकिक आणि मराठी रंगभूमीच्या ओढीने आंध्रप्रदेशातील दोन ज्येष्ठ रंगकर्मी, अभ्यासक मूर्ती यांच्या माध्यमातून पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यासाठी पुण्यात येत आहेत.महाराष्ट्रातील संगीत रंगभूमीवरील काही कलाकार 120 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात स्थायिक झाले.
सुरभी नाटक मंडळी या संस्थेच्या माध्यमातून संगीत नाटकांचे नियमित प्रयोग करू लागले. मराठी कलाकारांमुळे आंध्र प्रदेशात संगीत रंगभूमीची पाळेमुळे रोवली गेली आणि प्रेक्षकवर्ग तयार झाला. आंध्रमधील अनेक भागात ही नाटक मंडळी सध्या कार्यरत आहेत.
मूर्ती हे गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आवर्जून पाहत आहेत. मूर्ती हे महाराष्ट्र बँकेत नोकरीला होते त्यामुळे ते मराठी नाट्यक्षेत्रातील कलावंत, लेखक, संगीतकार यांच्या संपर्कात राहू शकले. त्यामुळे त्यांनाही मराठी नाटकाची गोडी लागली.
आंध्र प्रदेशातील मूर्ती यांचे मित्र व्ही. व्ही. एल. श्रीवास आणि एस. पी. आदिनारायण पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यासाठी पुण्यात येत आहेत. श्रीवास हे नाट्य शास्त्राचे प्राध्यापक आहेत. नाट्य शास्त्राचे अभ्यासक या नात्याने ते पाँडेचेरी, भूवनेश्वर, अमृतसर आणि दिल्ली येथे कार्यरत होते. पथनाट्य या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच ते देशातील विविध विद्यापीठांमधील नाट्यशास्त्र विभागात परिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. आदिनारायण हे तेलगू रंगभूमीवरील कलावंत असून लेखकही आहेत. 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते रंगभूमीशी जोडले गेलेले आहेत.
मराठी रंगभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थी कशा पद्धतीने कार्यरत आहेत हे श्रीवास आणि आदिनारायण यांना पाहण्याची इच्छा असल्याने त्यांना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निमंत्रित केले असून ते पुण्यात येत असल्याचे मूर्ती यांनी सांगितले.
जाहिरात