गोल्डन आय न्यूज नेटवर्क
जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने
जैन मराठी विश्वकोशाची होणार निर्मिती : ललित गांधी!!
जैन धर्माच्या वैश्विकतेचे उलगडणार सार : सदानंद मोरे !
पुणे : जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ, मुंबई यांच्यावतीने जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे. या विश्वकोशात गेल्या पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळाच्या पुरातत्त्वीय ते अर्वाचिन इतिहासाचा आलेख दिला जाणार असून या विश्वकोशाद्वारे जैन धर्माच्या अभ्यासकांपासून सामान्य वाचकांना जैन धर्माची तटस्थ माहिती उपलब्ध होणार आहे. जैन धर्माच्या वैश्विक दृष्टीचे सार या कोशात सामावले असून या निमित्ताने भारतीय समाज-संस्कृतीचा इतिहास वाचकांसमोर उलगडला जाणार आहे, अशी माहिती जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील ज्येष्ठ साहित्यिक, संतसाहित्याचे अभ्यासक, संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, जैन साहित्याचे व इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संजय सोनवणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संदीप भंडारी, अर्चना लुणावत, महेश देसाई, संदीप लुणावत, रवींद्र शहा, अभिजित शहा उपस्थित होते.
विश्वकोशाचे कामकाज पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे चालणार असून कार्याचा शुभारंभ महावीर जयंतीदिनी (दि. 10) होणार आहे.
अतिप्राचिन परंपरा लाभलेला जैन धर्म समण संस्कृतीच्या स्थापनेतून सुरू झाला. समण म्हणजे सर्व जीवांकडे समभावाने पाहत अहिंसा व्रत धारण करून नित्यनैमित्तीक जीवनचर्या अवलंबण्याचा मार्ग. पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी मानवी सभ्यतेच्या विकासाचा पाया रचला. ही परंपरा भगवान महावीर यांनी कळसाला पोहोचवत अनेकांतवादासारख्या वैश्विक सिद्धांताला जन्म दिला.
ही जैन तत्त्वज्ञानाची परंपरा आजही आचरणात येत आहे. मौर्य सम्राट संप्रतिने आपल्या सत्ता काळात महाराष्ट्रात स्थिरावलेल्या जैन साधूमुनींच्या विचारांना उत्तेजन दिले. तसेच सातवाहन राजांनीही जैन धर्मास राजाश्रय दिला. यातूनच मराठी भाषा आणि संस्कृतीमध्ये जैन धर्माचे मोठे योगदान राहिले आहे.
महाराष्ट्राची मनोभूमिका तयार होण्यास जैन धर्माचा मोठा हातभार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यास सर्वाधिक उपयुक्त ठरलेल्या गाथा सप्तशती या हाल सातवाहनाने संपादित केलेल्या गाथांमध्ये पादलिप्ताचार्यांच्या अनेक गाथांचा समावेश आहे. जैन धर्माचे प्राचिन वाङ्मय प्राकृत भाषेत असून अर्थमागधी, मागधी, शौर्यसेनी, माहारास्त्री, तेलगु, तामिळ, कन्नड इ. प्रादेशिक भाषांमध्ये विपुल प्रमाणात सापडते. जैनांनी संस्कृत भाषेचाही उपयोग तत्त्वज्ञान मांडणीसाठी वापरल्याचे दिसून येते.
जैन धर्माची वैश्विक दृष्टी उलगडणारा जैन मराठी विश्वकोश हा बृहत प्रकल्प असून यात आकारविल्हेप्रमाणे जैन धर्मातील 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 63 शलाकापुरुष, 9 नारायण, प्रतिनारायण तसेच जैन प्राचिन ते अर्वाचिन साहित्य, साहित्यकार, तत्त्वज्ञ, गणधर, बलदेव, पुराणकथा इत्यादींची माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.
या कोशाच्या निमित्ताने भारतीय समाज-संस्कृतीचा इतिहासही वाचकांसमोर उलगडला जाणार आहे. या विश्वकोशातील माहिती तज्ज्ञ संशोधकांकडून खात्री केल्यानंतरच लिखित स्वरूपात प्रकाशनासाठी निवडण्यात येणार आहे.
ज्यायोगे जैन मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता जपली जाईल. या उपक्रमाकरिता जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ज्येष्ठ साहित्यिक, संतसाहित्याचे अभ्यासक, संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, कार्यकारी अध्यक्ष विलास राठोड, ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार हे मुख्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत असून जैन साहित्याचे व इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संजय सोनवणी हे संपादकीय मंडळाचे प्रमुख आहेत. महावीर अक्कोळे, डॉ. सी. एन. चौगुले, गोमटेश पाटील, महावीर शास्त्री, डॉ. अजित पाटील यांचा संपादकीय मंडळात सहभाग आहे.