गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणेतर्फे बुधवारी ‘रामपर्व’ सांगीतिक कार्यक्रम !!
पुणे : रामायणातील काही दुर्लक्षित व्यक्तिरेखांवर आधारित ‘रामपर्व’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे.
रामायण हा भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात प्रभू रामाचे अढळ स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर समस्त भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रामायणात अशा काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग आहेत ज्यावर कदाचित काव्य रचले गेलेले नाही.
हाच दुवा धरून त्या व्यक्तिरेखा आणि प्रसंगावर आधारित काही काव्यरचना कवी अमित गोखले (पार्थ) यांनी रचल्या आहेत. गीतरामायणातील अविट गोडी असलेल्या रचनांप्रमाणेच ‘रामपर्व’ कार्यक्रमातील रचनांना संगीतकार हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले असून ते रचना सादर करणार आहेत. शुभदा आठवले, केदार तळणीकर, अवधूत धायगुडे, वेधा पोळ साथसंगत करणार आहेत.
आपल्या मनात खोलवर रुजलेल्या या विषयाला एका वेगळ्या संहितेत बांधून रसिकांसमोर नवनिर्मितीचा आनंद ‘रामपर्व’द्वारे प्रकट करण्याचा मानस आहे, असे कार्यक्रमाचे संयोजक हेमंत आठवले यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.