गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पूना गेस्ट हाऊसच्या शिरपेचात मानाचा तुरा टपाल पाकिटावर झळकले पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र !
पुणे : पुण्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या तसेच कलाकारांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पूना गेस्ट हाऊसच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. गेली 90 वर्षे आदरातिथ्य क्षेत्रात अविरतपणे आणि आपुलकीने सेवा देणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र डाक विभागाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे टपाल पाकिटावर प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचे अनावरण एका शानदार सोहळ्यात आज करण्यात आले.
प्रकाशनप्रसंगी उपस्थित सरपोतदार कुटुंबिय.
टपाल विभागातर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील कलादालनात दोन दिवसीय पुणेपेक्स प्रदर्शनिचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आज (दि. 7) पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पूना गेस्ट हाऊसचे संचालक अभय व किशोर सरपोतदार तसेच साधना व शर्मिला सरपोतदार उपस्थित होते. भारतातील असा हा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे. पूना गेस्ट हाऊससह पुणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पूना गेस्ट हाऊसची भव्य वास्तू गेल्या 90 वर्षांपासून दिमाखात उभी असून हिंदी-मराठी चित्रपट तसेच नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांसह लाखो पुणेकरांनी पूना गेस्ट हाऊसमधील मराठमोळ्या आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतला आहे आणि ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे.
पूना गेस्ट हाऊसची स्थापना 1935 मध्ये मूकपटाचे आद्यनिर्माते, दिग्दर्शक, लेखक कै. नानासाहेब सरपोतदार यांनी केली.
त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी कै. सरस्वतीबाई सरपोतदार आणि त्यांचे सुपुत्र निर्माते कै. चारुदत्त सरपोतदार यांनी पूना गेस्ट हाऊसची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कलाकारांचे माहेरघर आणि अस्सल महाराष्ट्रीयन जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळण्याचे ठिकाण अशी ओळख असलेल्या पूना गेस्ट हाऊसची परंपरा आता तिसऱ्या पिढीचे अभय व किशोर सरपोतदार तसेच साधना व शर्मिला सरपोतदार यांच्या बरोबरीने चौथ्या पिढीतील सनत सरपोतदार हे आधुनिकतेची कास धरून सांभाळत आहेत. त्यांनी पूना गेस्ट हाऊसचा विस्तार मॉल, म्युझियम आणि आयटी क्षेत्रातही केला आहे.
टपाल विभागाच्या उपक्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक करून किशोर सरपोतदार मनोगत व्यक्त करताना या वेळी म्हणाले, इंटरनॅशल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटीचे बहुमोल सहकार्य या कामी लाभले आहे. टपाल विभाग आणि इंटनॅशनल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटी यांचे कार्य रत्नपारख्याचे आहे. स्वत:चे वेगळेपण जपतानाच इतर संस्थांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी पूना गेस्ट हाऊसची केलेली निवड आणि संस्थेचे छायाचित्र टपाल पाकिटावर प्रसिद्ध करून आमची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगाच्या पाठीवर होणार आहे.
पूना गेस्ट हाऊसला मिळालेला बहुमान आमची जबाबदारी वाढविणारा आणि प्रोत्साहन देणारा आहे.
जाहिरात