गोल्डन आय न्यूज नेटवर्क
इंदिरा अत्रे वाचनकक्षात गुढीपाडव्यानिमित्त अभिनव अशी पुस्तकांची गुढी
अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांचा वाचन संकल्प
Pune : सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा’च्या माध्यमातून पुस्तक गुढीचे आयोजन करण्यात आले होते. वाचनाचे संस्कार लहान वयातच व्हावेत, या उद्देशाने ‘संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी ही ‘पुस्तकांची गुढी’ साकारत नववर्षाचे स्वागत केले.
गुढीपाडव्यानिमित्त ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा’मध्ये उभारण्यात आलेल्या अभिनव अशा ‘पुस्तक गुढी’ सोबत आबासाहेब अत्रे प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक
प्रत्यक्ष पुस्तकांचीच गुढी उभारण्याचा अभिनव असा हा उपक्रम पहिल्यांदाच संपन्न झाला. ‘जागतिक बाल पुस्तक दिना’च्या पूर्वसंध्येला उभारण्यात आलेल्या या पुस्तक गुढीत जादूची, परुकथा, राक्षसांच्या गोष्टी सांगणारी अद्भुतरम्य कल्पना असलेल्या पुस्तकांचा समावेश करत परिकथाकार हँन्स अँडरसन यांनाही अभिवादन करण्यात आले.
‘गुढी उभारू पुस्तकांची जोपासण्या वाचन संस्कृती’ असे म्हणत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच नित्यनेमाने अवांतर वाचनही करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी बोलताना भडसावळे म्हणाले, ‘आजकाल लहान वयातच मुलांच्या हाती मोबाइल असतो. त्याच्या अती वापराचे दुष्परिणाम लक्षात येत असल्याने मुलांच्या हातात गोष्टींची पुस्तकंही दिली तर मोबाइल वेड कमी व्हायला मदत होते. चांगलं, दर्जेदार साहित्य मुलंही आवडीने वाचतात.’
वाचनाची आवड रुजवणारी ही साहित्य गुढी विशेष पद्धतीने सजविल्यामुळे एकप्रकारे ही भारतीय संस्कृतीची विजय पताका ठरली असल्याची भावना उपस्थित शिक्षक व पालकांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कलाशिक्षिका प्रतिभा भडसावळे यांनी गुढी व पुस्तकांचे तोरण तयार केले.
याप्रसंगी अत्रे प्रशालेचे प्राचार्य प्रवीण सुपे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका चंचला ललवाणी, प्राथमिक विभागाच्या समीक्षा गायकवाड, प्रसाद भडसावळे, ज्योती जोशी, हरेश पैठणकर, विजयकुमार कुलकर्णी, अण्णासाहेब बनकर, केशव तळेकर, सचिन गायकवाड, उत्तम साळवे, मोहिनी शिंदे, अनिल मुटकुळे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.