गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बालसाहित्यातील दुर्बोधता कमी व्हावी
ग्रामीण भाषेतही बालसाहित्याची निर्मिती व्हावी परिसंवादात उमटला सूर : बालकुमार साहित्य संमेलन
चाळकवाडी (ता. जुन्नर) : बालसाहित्याविषयी समाजात आज संमिश्र भावना आहेत. बालसाहित्यातील दुर्बोधता कमी व्हावी. प्रमाणभाषेच्या वापरापेक्षा बोलीभाषेतील साहित्याची निर्मिती व्हावी, ज्यायोगे ते मुलांच्या भावविश्वाला रुचेल. ग्रंथालयात सुमार दर्जाची पुस्तके नकोत, रंजकतेने परिपूर्ण पुस्तके मुलांना विशेष भावतात. वाचनासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे. त्यांनी काय वाचावे याविषयी पालकांनी निर्णय घेण्याऐवजी मुलांना काय वाचायला आवडते ते पालकांनी जाणून घ्यावे, असा सूर परिसंवादात उमटला.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात ‘बालसाहित्याची सद्य:स्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात अनिल कुलकर्णी (पुणे), जालिंदर डोंगरे (जुन्नर) यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी डॉ. कैलास दौंड (पाथर्डी) होते.
बालसाहित्याची सद्य:स्थिती’ विषयावरील परिसंवादात बोलताना अनिल कुलकणी. समवेत जालिंदर डोंगरे आणि डॉ. कैलास दौंड.
जालिंदर डोंगरे म्हणाले, बालसाहित्याची आजची स्थिती आश्वासक वाटते आहे. तिचा प्रवास रंजकतेकडून मंजकतेकडे होत आहे. मागील पिढीत बालसाहित्यात विपुल संपदा निर्माण झाली. मधल्या काही काळात ते शहरी भागात जास्त प्रमाणात निर्माण होत होते.
त्यामुळे गावपातळीवर ते पुरेसे पोहोचले नाही. बालसाहित्यातील दुर्बोधता कमी व्हावी, ते मुलांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवावे. शहरी भागातील काही शब्द व संदर्भ ग्रामीण भागातील मुलांना आकलन होत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातही उत्तम दर्जाची बालसाहित्य निर्मिती व्हावी. रंगीत सचित्र पुस्तके मनोरंजनात्मक असतात अशी पुस्तके लहान मुलांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
अनिल कुलकर्णी म्हणाले, बालसाहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांनी मुलांच्या मनोविश्वाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मुलांच्या वयोगटानुसार साहित्याची निर्मिती होणे गरजेचे असून ग्रामीण भाषेतही साहित्याची निर्मिती व्हावी.
अन्यथा बोलीभाषेतील अनेक शब्द काळानुसार लोप पावतील. पालकांनी सजगतेने मुलांना पुस्तके विकत घेवून द्यावीत आणि वाचनाची गोडी लावावी. लेखकांनी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे, ज्यायोगे त्यांची वैचारिक बैठक तयार होते आणि त्यांना साहित्यबीजाचे आकलन होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कैलास दौंड म्हणाले, गावागावात शाळा-शाळांमध्ये ग्रंथालयात सुमार जर्दाची पुस्तके नकोत.
मुलांच्या भाषेत आणि बोलीभाषेत बालसाहित्यिकांनी लिखाण करावे. बालसाहित्याच्या प्रचारासाठी संस्थांची उभारणी व्हावी आणि त्या एकमेकांशी जोडल्या जाव्यात. शिक्षणासह साहित्यकृतींच्या वाचनातून मुलांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण होत असते. बालसाहित्यिक दीपस्तंभासारखे कार्य करत आहेत.
कविता-कथांचे सादरीकरण
‘मनोरंजनातून बालसाहित्य’ या दुसऱ्या सत्रात संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत सराफ, एकनाथ आव्हाड (मुंबई) यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला. आव्हाड यांनी ‘सविता पटेकर-सतत गैरहजर’ यासह वार्षिक शाळा तपासणीवरील कविता, ठमाकाकुंची कविता तसेच माझी वही या कविता सादर केल्या. तर कावळ्याने खाल्ल्या शेवया ही कथा प्रभावीपणे सादर केली.
तिसऱ्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिक भास्कर बडे (बीड) होते. तर बालसाहित्यिक अलका बडे (धाराशिव) यांची उपस्थिती होती.
कथापंचक या चौथ्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांनी कथावाचन केले. यात पाच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी डॉ. विनोद सिनकर (छत्रपती संभाजीनगर) होते. कथाकथन या पाचव्या सत्रात रमेश तांबे (मुंबई), संजय ऐलवाड (पुणे), बाळकृष्ण बाचल (पुणे), उत्तम सदाकाळ (जुन्नर) या बालसाहित्यिकांचा सहभाग होता.
शाखा पदाधिकारी निवड
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या चाळकवाडी आणि भोसरी शाखेच्या अध्यक्षांना निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चाळकवाडी संस्थेचे अध्यक्ष संदीप वाघोले यांनी तर भोसरी शाखेचे अध्यक्ष अण्णासाहेब महाले यांनी पत्र स्वीकारले.