Marathi FM Radio
Sunday, April 20, 2025

पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांचे रंगले सहवादन !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

चार पिढ्यांच्या सुमधूर बासरी वादनातून रसिक संमोहित !

पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांचे रंगले सहवादन !!

पुणे : जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘बांसुरी परंपरा‌’ या अनोख्या सांगितीक महोत्सवात चार पिढ्यांच्या वादनातून बासरीचे सुमधूर स्वर अनुभवायला मिळाले. या सहवादनात 9 ते 75 या वयोगटातील 80 कलाकारांचा समावेश होता.

Advertisement

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ज्ञान प्रवाहित ठेवताना प्रत्येक गुरूला आपल्या शिष्याची प्रगती पाहून आनंद होतो तसेच हे ज्ञान अखंडितपणे पुढील पिढीकडे दिले जाईल याचे शाश्वत समाधानही मिळते. ‌‘बांसुरी परंपरा‌’ या महोत्सवाच्या माध्यमातून अखंडितपणे सुरू असलेली बारसी वादनाची परंपरा प्रवाहित होताना पाहून पुणेकर रसिकांचे मनही समाधान पावले.

Advertisement

Advertisement

तसेच शिष्य वर्गालाही आपल्या गुरूंसमवेत सादरीकरण करण्याचा अनोखी संधी लाभली. पंडित रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि मृगेंद्र मोहाडकर यांच्या ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे द पूना वेस्टर्न क्लब, भूगाव येथे दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
‌‘बांसुरी परंपरा‌’ महोत्सवात जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रूपक कुलकर्णी यांचे रंगलेले बासरीवादन महोत्सवाचा कळसाध्याय ठरले.

Advertisement

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ शिष्य तसेच पुढील पिढीतील शिष्य यांच्या बासरी सहवादनाने ऋतुचक्राच्या उलगडलेल्या छटा रसिकांना मोहित करून गेल्या.
भारतीय शास्त्रीय संगीतात राग आणि ऋतू यांचे अनोखे भावबंध जुळलेले दिसतात. ऋतुनुसार मानवी भावनांचे बदलते रूप या स्वराविष्कारातून प्रभावीपणे मांडण्यात आले. बसंत ऋतूतील सादरीकरण करताना राग, प्रेम, आनंद आणि नाविन्यतेचे प्रतिक मानला जाणारा हिंडोल राग सादर करण्यात आला. ग्रीष्म ऋतूचे दाहक दर्शन घडविताना कलाकारांनी वृदांवनी सारंग रागाचे प्रकटीकरण केले.


त्यानंतर पंडित रूपक कुलकर्णी यांनी रचलेली मियाँमल्हार आणि मेघमल्हार रागांचे अनोखे मिश्रण दर्शविणारी रचना ऐकवून वर्षा ऋतूच्या आगमनाने आनंदीत झालेल्या सृष्टीचे जणू गाणेच ऐकविले.

शांत आणि प्रसन्न भावना दर्शविणाऱ्या शरद ऋतूचे वर्णन बासरीवादनातून साकारताना नटभैरव रागातील सुंदर रचना सादर केली. हेमंत रागाचे वैशिष्ट्य उलगडताना राग यमनमधील कलात्मकतेने केलेले सादरीकरण रसिकांना भावले. तर शिशिर ऋतूचा स्वराविष्कार सादर करताना राग किरवाणीचे मोहक सादरीकरण करून सर्व कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.


पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांनी राग खमाजवर आधारित शब्दप्रधान गायकी असणाऱ्या ठुमरीचे स्वर बासरी वादनातून ऐकविल्यानंतर उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत पंडितजींना मानवंदना दिली. गुरूंच्या छत्रछायेत बहरलेल्या शिष्यांना पाहून रसिकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. पंडित अरविंदकुमार आझाद (तबला), सौरभ गुळवणी (बेस तबला), शंतनू पांडे (की-बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तनिष्क अरोरा यांचे गायन झाले. त्यानंतर मृगेंद्र मोहाडकर आणि जयकिशन हिंगु यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी रंगली.

पहिल्या दिवसाची सांगता सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाली. कलाकारांना पंडित भरत कामत, दिपिन दास, सपन अंजारिया (तबला), सुयोग कुंडलकर, आकाश नाईक (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

‌‘प्यारभरे स्वरोंका और दिल का रिश्ता मन को आनंदित करता है‌’ : पंडित हरिप्रसाद चौरसिया

व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शिष्यांना पाहून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली ही मुले सर्वच कला क्षेत्रात उत्तम पद्धतीने ज्ञान संपादन करत आहेत ही गोष्ट खूप आनंददायी आहे, असे सांगून पुढील वर्षी या महोत्सवात येईन आणि त्या वेळी इथे उपस्थित प्रत्येक पुणेकराच्या हातात बासरी असावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिष्यांचे वादन ऐकून प्रसन्नचित्त झालेल्या पंडितजींनी ‌‘प्यारभरे स्वरोंका और दिल का रिश्ता मन को आनंदित करता है‌’ अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular