गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरझंकार म्युझिक अकॅडमी, झपूर्झा म्यूझियम ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे आयोजन !
‘स्वरदिपावली’तून रसिकांना गायन-वादनाची सुरेल भेट !
पुणे : नभात पसरलेली लालीमा, पक्षांचा किलबिलाट, अथांग पाण्यावर अलगदपणे उमटलेली सूर्यकिरणांची सोनेरी झळा अशा भारलेल्या मनमोहक वातावरणात प्रभातकालींन रागांच्या सुरावटींची दैवी अनुभूती तसेच सायंकालीन रागांच्या मैफलीची भेट रसिकांना मिळाली.
निमित्त होते ते स्वरझंकार म्युझिक अकॅडमी व झपूर्झा म्यूझियम ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे कुडजे येथील निसर्गरम्य अशा झपूर्झा येथील दोन दिवसीय गायन-वादनाच्या स्वरदिपावली महोत्सवाचे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी युवा गिटारवादक प्रतिक राजकुमार यांचे शास्त्रीय वादन झाले.
स्वरदिपावलीत गायन करताना पंडित जयतीर्थ मेवुंडी
त्यांनी राग मिश्रदेसने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर राग यमनची झलक दाखवत हिंदी चित्रपटसृष्टीतील या रागाचा केलेला वापर काही गीतांद्वारे ऐकविला. उस्ताद शाहीद परवेझ आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी रचनलेल्या दोन बंदिशी सादर करून रसिकांच्या मने जिंकली.
‘अच्युतम् केशवम् कृष्ण नारायणम्’ या भजनाने गिटार वादनाची सांगता करताना त्यांनी रसिकांना ताल धरायला लावला. त्यांना सागर पटोकर (तबला) आणि दीप (काहोन) यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग मारवा श्रीने केली. यानंतर दिवाळीच्या सणाचे वैशिष्ट्य सांगणारी ‘साई भयी घर अंगन सजे’ ही स्वरचित बंदिश सादर केली
स्वरदिपावलीत व्हायोलिन वादन करताना तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये
‘पर्व दिवाली सब है मनावत’, ‘पाप नाश दुरित शमन चतर सुखदा बालमवा’ या बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या. ‘या भवनातील गीत पुराने’ या नाट्यगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘नाम जपन क्यूं छोड दिया’ हे भजन सादर केल्यानंतर रसिकांच्या आग्रहाखातर पंडित मेवुंडी यांनी ‘लक्ष्मी बारम्मा’ ही लोकप्रिय रचना सादर केली. ‘अगा वैकुंठिच्या राया’ या रचननेचे मैफलीची सांगता केली. त्यांना पांडुरंग पवार (तबला) आणि उदय कुलकर्णी (हार्मोनियम) यांनी समर्पक साथसंगत केली.
स्वरमैफलीच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रभातकालीन सत्राची सुरुवात प्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक तेजस व राजस उपाध्ये यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी नटभैरव रागात आलाप, जोड, झाला तसेच दृतलय सादर करून रसिकांना अचंबित केले. ‘वैष्णव जन तो’ या भजनाने उपाध्ये बंधू यांनी आपल्या वादन मैफलीची सांगता केली. त्यांना अमन वरखेडकर (की-बोर्ड) आणि अनुराग अलुरकर (तबला) यांनी साथसंगत केली.
स्वरदिपावलीत गायन करताना पंडित शौनक अभिषेकी
दोन दिवसीय स्वरमैफलीचा समारोप प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाला. पंडित अभिषेकी यांनी बिलासखानी तोडीतील ‘रे सत्गुरू’ या बंदिशीने मैफलीची सुरुवात केली. याला दृतलयीतील ‘जगदंबिका दुर्गे भवानी’ या रचनेने जोड दिली. ‘कोयलिया बोलत लजाये’ या हिंडोल बहार रागातील रचनेने रसिकांवर सुरेल जादू केली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या भैरवी मंगल तोडी रागातील विविध बंदिशी सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी ‘निंदियासे नयना झुके’, ‘पायलीया बाजे रे मोरी’ या रचनांनी समारोप केला. त्यांना उदय कुलकर्णी (हार्मोनियम), सुभाष कामत (तबला) यांनी साथसंगत केली.
आसमंतात पसरलेल्या स्वरांना सोबत घेत रसिकां दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.कलाकारांचा सत्कार अजित गाडगीळ, रेणुगा गाडगीळ, पंडित अतुलकुमार उपाध्ये, सुनील पाठक यांनी केला.
स्वरदिपावलीत गिटार वादन करताना प्रतिक राजकुमार
जाहिरात