गोल्डन आय न्यूज नेटवर्क
साहित्य, नाटक, लोककलांमुळे मराठी भाषा टिकून : प्रा. सतीश आळेकर !
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिक, कलावंत, रंगकर्मींचा सत्कार
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि महकतर्फे विशेष कार्यक्रम.
‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें’ कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. पण मराठी भाषा टिकविण्यासाठी आपण काय करतो? शहरांमध्ये भाषेच्या संवेदना क्षीण झालेल्या दिसतात. मात्र सध्याच्या विरोधाभासी, विखंडवादी जगात मराठी भाषा टिकविण्याचे मोलाचे काम साहित्य, नाटक आणि लोककलांमधून होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, जनस्थान पुरस्काराचे मानकरी प्रा. सतीश आळेकर यांनी केले.
मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिक, कलावंत, रंगकर्मी यांचा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज (दि. 27) संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि महक यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार प्रा. आळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुल पंडित (नाट्यसंगीत), डॉ. प्रकाश खांडगे (लोकसाहित्य), शाहीर हेमंत मावळे (पोवाडा), राजाभाऊ चोपदार (श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशपरंपरागत पालखीचे चोपदार, वारकरी), त्यागराज खाडिलकर (कीर्तन), रघुनाथ खंडाळकर (अभंगवाणी), मनिषा निश्चल (भावगीत) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
प्रा. आळेकर पुढे म्हणाले, भाषेमध्ये शुद्ध-अशुद्ध असे काही नसते. प्रत्येक बोलीभाषेतून आपली संस्कृती झिरपत गेलेली असते. भाषा जीवनात कशी झिरपत गेली याचे गणित मात्र मांडता येत नाही. मराठी भाषेचे काय होणार, भाषेबाबत नवीन काही संस्कृती येणार का असे प्रश्न उपस्थित केले जातात. मराठी भाषा टिकवायची असेल तर प्रत्येकाने पुढील पिढीला मराठी भाषा शिकविली पाहिजे.
कलेच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा सत्कार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे आवर्जून नमूद करून कृष्णकुमार गोयल म्हणाले, दैनंदिन व्यवहारात बोली भाषेचा वापर झाला नाही तर त्या भाषा लोप पावतात हा इतिहास आहे.
मराठी भाषा साहित्य, संस्कृती कलांपुरती मर्यादित रहायला नको. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तरच ती टिकेल. साहित्याचा उत्सव साजरा केला म्हणजे मराठी भाषा टिकेल असे नाही. प्रत्येक क्षेत्रात स्वभाषेचा आग्रह धरला गेला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा चिरकाल टिकण्यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे.
पुरस्कारप्राप्त कलाकारांच्या वतीने प्रा. प्रकाश खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें’ या गीत, संगीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बकुल पंडित, शाहीर हेमंत मावळे, राजाभाऊ चोपदार, त्यागराज खाडिलकर, रघुनाथ खंडाळकर, मनिषा निश्चल यांचा सहभाग होता. झंकार कानडे, सागर टेमघरे (की-बोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक, पखवाज), संतोष पेडणेकर (तालवाद्य), विजय तांबे (बासरी), अमेय ठाकुरदेसाई (तबला), सिद्धार्थ कदम (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.