गोल्डन आय न्यूज नेटवर्क
माय मराठीच्या जयघोषात दुमदुमली राजधानी !!
दिल्लीकरांनी अनुभवला माय मराठीच्या ग्रंथदिंडीचा अभूतपूर्व सोहळा !!
दिल्ली : भव्य शोभा यात्रा, माय मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्जवल परांपरा जपणाऱ्या लोक कलाकारांच्या सादरीकरणाने आज (दि. 21) दिल्ली दुमदुमली. ग्रंथदिंडीचा दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ आणि मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सरहद, पुणे आयोजित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दि. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा) येथे आयोजन करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ‘अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन’ ही ओवी तसेच कवी कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ या ओळी चित्ररथावर साकारल्या होत्या. सरस्वतीचे चिन्ह, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वीणा यांची प्रतिकृती तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिकांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती, छायाचित्रे अशा सांस्कृतिक ठेव्यातून अभिजात मराठीची भाषेची गुढी उभारण्यात आली होती.
अंबारीच्या चित्ररथातून ही दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशाचा गजर, आदिवासी नृत्य, लेझीम पथक, विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले रसिक यांचा या शोभायात्रेत विशेष सहभाग होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पारंपरिक मराठी वेशभूषेतील स्त्री-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
चित्ररथाची संकल्पना महाराष्ट्र शासनाची होती.
पंचक्रोशी मावळ हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या घोरावडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडीने टाळ, मृदंग, वीणेसह धरलेल्या तालावर साहित्यप्रेमी दंग झाले. दिंडीपुढेे डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.
महिलांनी मराठी संस्कृतीची ओळख दर्शविताना फुगडीचा फेर धरला तर कल्याणच्या लेझिम पथकाने बहारदार लेझिम सादर केलेे. युवक-युवतींनी आदीवासी नृत्य केले. सार्थ तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, दासबोध आणि भारताचे संविधानाने ग्रंथदिंडीतील पालखीची शोभा वाढवली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकेसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या टोप्या घालून सीमा भागातील मराठी बांधव साहित्य ग्रंथदिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दिल्लीतील अमराठी रसिकांनी ढोल-ताशा वादन तसेच्या गोंधळींच्या सादरीकरणाच्या तालावर केलेले भांगडानृत्य विशेष आकर्षण ठरले.
दिल्लीच्या प्रशस्त मार्गांवरून निघालेला हा पालखी सोहळा डोळ्यांत साठविण्यासोबतच आपापल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचीही चुरस दिल्लीकरांत दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा झालेली लोकांची गर्दी, वाहने पांगवताना वाहतूक पोलीसांनीही या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी दिल्ली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन आणि संयोजन करण्यात आले होते.
संसद भवन ते तालकटोरा मैदान दरम्यान काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने असलेले ग्रंथनगरीचे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासमोर साहित्यप्रेमी आदराने नतमस्तक होत होते. या प्रसंगी दिल्लीस्थित राम मीना या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुरेख रेखाचित्र काढले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे संमेलनाचे ध्वजारोहण महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मिलिंद मराठे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजन लाखे, सुनीताराजे पवार, ॲड. प्रमोद आडकर, विनोद कुलर्की आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.