गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पानसे मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम रविवारी!
सरदार पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
राजीव पानसे, के. एस. पानसे यांचा पानसे कुलभूषण पुरस्कार देऊन होणार गौरव .!!
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पेशवाईच्या अखेरपर्यंत आपल्या शौर्य आणि बुद्धीकौशल्याने नावलौकिक प्राप्त करणाऱ्या सरदार पानसे घराण्याच्या पानसे मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येत्या रविवारी (दि. 8) आयोजित करण्यात आला आहे. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि काही ज्येष्ठ व्यक्तींना पानसे कुलभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पानसे मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत दिगंबर पानसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. पानसे घराणे हे मूळ कर्नाटकातील पण 14व्या शतकात पानसे मंडळी महाराष्ट्रात आली. प्रथम बार्शी आणि नंतर सासवड जवळच्या सोनोरी गावी स्थायिक झाली. नंतर संपूर्ण महाराष्ट्रात विखुरली गेली. स्वत:च्या हुशारीने आणि कर्तबगारीने सरकार दरबारी आपली सेवा सुरू केली. प्रथम शेती आणि नंतर शासकीय जबाबदाऱ्या आणि स्वराज्य स्थापनेपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेत अशी चढती भाजणी या पानसे घराण्याने बघितली आहे.
पानसे मंडळाची स्थापना 1973मध्ये करण्यात आली आहे. पानसे मंडळाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी त्रैवार्षिक निवडणुका घेऊन कार्यकारिणी निवडली जाते.सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ऑटो कॉम्प इंडस्ट्रीजचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक राजीव पानसे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत.
त्यानंतर पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचे ‘पानसे घराण्याचे महाराष्ट्रातील इतिहासात योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे माजी मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक के. एस. पानसे आणि ऑटो कॉम्प इंडस्ट्रीजचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक राजीव पानसे यांचा पानसे कुलभूषण पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
या नंतर सुरेल संगीत सभा आयोजित करण्यात आली असून यात सायली पानसे-शेल्लेकरी, अंजली पानसे, शौनक पानसे, स्वरदा गोखले-गोडबोले यांचा सहभाग असणार आहे.