गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शिलेदार कुटुंबियांनी केले रसिकांवर अधिराज्य : शरद पवार
गंधर्व काळातील संगीत रंगभूमीची उर्जितावस्था पुन्हा पहायला मिळेल.!
मराठी रंगभूमी, पुणेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संजय देशपांडे, रोहन भडसावळे यांचा शिलेदार पुरस्काराने गौरव !!
पुणे : मराठी संगीत रंगभूमीबद्दल ज्याकाळी चिंता वाटावी अशी स्थिती होती त्याकाळी या रंगभूमीविषयी आस्था असलेल्या शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी अतिशय कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जिवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार, जयमालाबाई आणि त्यांच्या कन्या लता तसेच कीर्ती यांनी आपल्या कलेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य केले.
युवा पिढी संगीत रंगभूमीकडे वळत आहे हे पाहून गंधर्व काळातील संगीत रंगभूमीची उर्जितावस्था पुन्हा पहावयास मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (दि. 2 ऑक्टोबर) मराठी संगीत रंगभूमीची दीर्घकाळ सेवा केल्याबद्दल ज्येष्ठ ऑर्गन वादक संजय हरिभाऊ देशपांडे आणि आश्वासक युवा तबला वादक रोहन भडसावळे यांचा शिलेदार पुरस्काराने पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात (डावीकडून) सत्यजीत धांडेकर, सतिश भिडे, संजय देशपांडे, शरद पवार, रोहन भडसावळे, लता भोगले, लीला गांधी आणि समीर हंपी.
त्या वेळी पवार बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात मराठी रंगभूमी, पुणेच्या अध्यक्ष लता भोगले, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, उद्योजक सतिश भिडे, नाट्यव्यवस्थापक सत्यजीत धांडेकर, समीर हंपी व्यासपीठावर होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पवार पुढे म्हणाले, संगीत नाटकाची परंपरा जतन केली पाहिजे, वाढविली पाहिजे या आस्थेतून शिलेदार कुटुंबियांनी तीन दिवसीय नाट्य महोत्सव यशस्वी करून दाखविला याबद्दल शिलेदार कुटुंबिय आणि संस्थेचे सर्व रसिकांच्या वतीने जाहीरपणे अभिनंदन करतो. ते पुढे म्हणाले, संगीत रंगभूमीसाठी एक नवीन पिढी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून शिलेदार कुटुंबियांनी तळमळीने कष्ट केले.
मराठी रंगभूमी, पुणे संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संगीत नाट्यमहोत्सवात आयोजित संगीत संशयकल्लोळ नाटकाचा आनंद घेताना शरद पवार व इतर.
संगीत नाटकांचे अनेक प्रयोग केले. यातून नवीन पिढी तयार झाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून संगीत रंगभूमीचे महाराष्ट्रात पुनरुज्जिवन होईल.प्रास्ताविकात वर्षा जोगळेकर यांनी मराठी रंगभूमी, पुणेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी संगीत नाटकांचे महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
मराठी रंगभूमी, पुणे अमृतमहोत्सवात पदार्पण करीत असल्याबद्दल ज्येष्ठ ऑर्गन वादक हरीभाऊ देशपांडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव वसंत देशपांडे यांनी दीप्ती भोगले, वर्षा जोगळेकर यांचा विशेष सन्मान केला.शरद पवार यांचा सत्कार लता भोगले, सत्यजित धांडेकर, समीर हंपी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी जोगळेकर यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ या सदाबहार नाटकाचा प्रयोग रंगला. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या प्रयोगाचा शरद पवार यांनीही आनंद घेत सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. तीन दिवसीय महोत्सवाला पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
जाहिरात