गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘श्रीं’चरणी 50 कलाकारांनी सादर केला सुरेल गीतांचा नजराणा !
सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवी वर्षात अनोखा विक्रम !!
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या स्वरमंचावर पुण्यातील प्रसिद्ध कलाकारांसह बाल, युवा तसेच ज्येष्ठ अशा 50 कलाकारांनी ‘श्रीं’चरणी गीतांचा नजराणा सादर करून रसिकांना सुश्राव्य भेट दिली. ‘सुवर्ण संगीत मैफल’ या उपक्रमाद्वारे सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाने अनोख्या अशा विक्रमाचीच जणू नोंद केली. ज्येष्ठ-श्रेष्ठ गीतकारांनी रचलेली, स्वरबद्ध केलेली आणि सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजाने रसिकांच्या मनामनात कोरली गेलेली गीते सादर करण्यात आल्याने ही मैफल वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
सहकारनगरमधील सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने 50 कलाकारांना मंडळाच्या स्वरमंचावर एकत्र आणण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची संकल्पना होती ती प्रसिद्ध गायक पंडित राजेश दातार यांची. नव्या, गुणवंत कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मंडळातर्फे दोन दिवस गायन स्पर्धा घेण्यात आली. यात बाल, युवा गटातील असंख्य कलाकारांनी भाग घेतला. त्यातील निवडक कलाकारांना सुवर्ण संगीत मैफलीत स्वरमंच उपलब्ध करून देण्यात आला.
सत्कार प्रसंगी जितेंद्र भुरूक, डॉ. अर्चना जोशी, नितीन पाटील, पंडित राजेश दातार.
प्रमोद रानडे, जितेंद्र भुरुक, पपीशकुमार ललगुडकर, मकरंद पाटणकर, राजीव बर्वे, मनिषा निश्चल, दत्ता थिटे, आरती दीक्षित, प्रज्ञा देशपांडे, मंजुश्री ओक, शीतल म्हसवडकर, प्रांजली बर्वे, उमा नेने, मुकेश ललगुडकर, निवेदिता सहा यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला.
‘तुने ओ रंगीले क्या जादू किया’, ‘ओ मेरे सोना रे’, ‘पिया… मोरा जिया पुकारे’, ‘सुन सायबा सुन’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, ‘सर जो तेरा चकराए’, ‘आज उनसे पहली मुलाकात होगी’, ‘आजकल पाँव जमींपर नही पडते’, ‘अजी रुठकर कहा जाईएगा’, ‘दिल चीज क्या है’, ‘तु जहा जहा चलेगा’, ‘पाहिले न मी तुला’, ‘खेड्यामधले घर कौलारू’ अशी भावविभोर करणारी हिंदी अन् मराठी गीते सादर करून कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
पंडित राजेश दातार यांनी या अनोख्या मैफलीची सांगता ‘लागा चुनरी मे दाग’ या प्रसिद्ध गीताने केली. रसिकांनीही टाळ्या आणि शिष्यांद्वारे उत्स्फूर्त दाद देत कलाकार-वादकांचे कौतुक केले.
सत्कार प्रसंगी नितीन पाटील, पंडित राजेश दातार, प्रमोद रानडे, पंडित अतुलकुमार उपाध्ये.
विवेक परांजपे, डॉ. राजेंद्र दूरकर, विनित तिकोनकर, विनोद सोनवणे, संजय खाडे, मंदार देव, अजित अवधनी यांनी दमदार साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संदीप पाटील, ऋतुजा फुलकर यांनी केले.
सुवर्ण संगीत मैफलीत सहभागी झाल्याबद्दल कलाकारांचे कौतुक करून मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी रसिकांसाठी नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील अशी घोषणा या प्रसंगी केली. कलाकारांचा सत्कार नितीन पाटील, मदन कटारिया, पंडित अतुलकुमार उपाध्ये, अमित कुलकर्णी, विजय ममदापूरकर, अमृता कुलकर्णी, आदिती कुलकर्णी, मिलिंद खंडेलवाल, डॉ. अर्चना जोशी, रोहन भोसले, स्वप्नील जाधव, प्रसन्न जावडेकर, चंद्रकांत कटारिया, स्मिता पाटील, रोहन पूरकर आदींनी केला.
जाहिरात